काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांनी कोणतंही ठोस कारण दिलं नाही. अशोक चव्हाणांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशामुळे काँग्रेसला नांदेडमध्ये मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. मात्र, एकीकडे अशोक चव्हाणांनी अचाकन भाजपामध्ये का प्रवेश केला? या प्रश्नाप्रमाणे भाजपानं भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या अशोक चव्हाणांना पक्षात का घेतलं? हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत उत्तर दिलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांचं मतदान पार पडलं असून तिसऱ्या टप्प्यासाठी येत्या ७ मे रोजी मतदान होईल. त्या पार्श्वभूमीवर देशभराती १२ राज्यांमधल्या ९४ मतदारसंघांमध्ये प्रचाराचा धडाका सुरू आहे. केंद्रीय मंत्रीही यासंदर्भात वेगवेगळ्या प्रचारसभांमधून विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत. अमित शाह यांनी ‘एबीपी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी भ्रष्टाचाऱ्यांना पक्षप्रवेश दिल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यावर भूमिका स्पष्ट केली.
भाजपा भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात का घेतेय?
मुलाखतीदरम्यान, अमित शाह यांना भ्रष्टाचारी नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचत नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमित शाह म्हणाले, “असं अजिबात होत नाही. आम्ही पक्षप्रवेश दिल्यानंतर एकाही व्यक्तीविरोधातील प्रकरण मागे घेतलेलं नाही. सगळ्या केसेस चालू आहेत. न्यायालयासमोर आहेत. न्यायालयाला त्यावर सुनावणी घ्यायची आहे. सर्व प्रकरणांमध्ये आरोपपत्रंही सादर झालेली आहेत”, असं अमित शाह म्हणाले.
अजित पवार व त्यांच्या पत्नीवर दाखल भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचं काय?
दरम्यान, राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना क्लीनचिट मिळाल्याबाबत व खुद्द अजित पवारांना पक्षात प्रवेश दिल्याबाबत अमित शाह यांना यावेळी विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी हे प्रकरण वरवर पाहून चालणार नाही, अशी मोघम प्रतिक्रिया दिली.
“ही तपास प्रक्रिया आहे. जेव्हा गुन्हा दाखल होतो तेव्हा चार ते पाच प्रकारच्या गोष्टी एकत्र करून वेगवेगळी प्रकरणं दाखल होतात. पण जेव्हा भ्रष्टाचाराचं एक मोठं प्रकरण दाखल होतं तेव्हा इतर लहान-मोठी प्रकरणं आपोआप रद्द होतात आणि सर्व मिळून एक मोठं प्रकरण एकत्रितपणे ती तपास यंत्रणा चालवते. त्यामुळे या घडामोडी इतक्या वरवरपणे पाहणं चुकीचं असून त्याच्या खोलात जाऊन पाहायला हवं”, असं अमित शाह म्हणाले.
वॉशिंग मशीनच्या आरोपावर अमित शाहांचा टोला
दरम्यान, विरोधकांकडून भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचाऱ्यांसाठी वॉशिंग मशीन असल्याचा आरोप केला जात असून त्यावर विचारणा केली असता अमित शाह यांनी विरोधकांनाच टोला लगावला. “आम्हाला वॉशिंग मशीनमध्ये टाकावं लागतंय याचा अर्थ तुमचे कपडे मळलेले तर आहेत ना? आमच्यावर आरोप करताना ते हे मान्य करतात की त्यांचे कपडे मळलेले आहेत”, असं अमित शाह म्हणाले.
“कुणालाही कायद्यापासून वाचवण्याचा प्रयत्न भाजपाच्या एकाही सरकारनं केलेला नाही. या मुद्द्यावर मी कधीही चर्चा करण्यासाठी तयार आहे”, असं थेट आव्हान अमित शाह यांनी दिलं.
अशोक चव्हाणांवर आरोप होऊनही पक्षात का घेतलं?
आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण यांच्यावर मोदींसह भाजपाच्या अनेक मोठ्या नेत्यांनी आरोप केले होते. त्यानंतरही त्यांना पक्षात का घेतलं? अशी विचारणा अमित शाह यांना केली असता त्यांनी त्यावर उत्तर दिलं. “कुणाला पक्षात घ्यायचं हे आमच्या पक्षाची स्थानिक संघटना ठरवते. पण अशा नेत्यांना घेतल्यानंतर त्यांच्याविरोधातलं कोणतंही प्रकरण जर रद्द झालं तर आमच्यावर होणारे आरोप खरे मानता येतील. पण असं कधीही झालेलं नाही”, असं ते म्हणाले.