केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर येऊन गेल्यापासून राज्यातील राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. अमित शाहांचा जन्म मुंबईत झाला, ते महाराष्ट्राचे जावई आहेत, असं असतानाही त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी काय केलं? असा प्रश्न विचारतानाच अमित शाहांना महाराष्ट्र कळतो म्हणजे काय? असा प्रश्न ठाकरे गटाने आज विचारला. त्यांच्या प्रश्नावर भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. तसंच, संजय राऊतांचा उल्लेख पत्रकार पोपटलाल असाही केला आहे.
हेही वाचा >> “महाराष्ट्रात दंगली पेटाव्यात आणि त्यातून…”, ठाकरे गटाचा भाजपावर गंभीर आरोप; म्हणाले, “देशाची सूत्रे गुजरातच्या…”
अमितभाई शाह यांना महाराष्ट्र कळतो म्हणजे काय? प्रभादेवीच्या गल्लीतील “पत्रकार पोपटलाल” आता ऐकाच! असं म्हणत शेलारांनी काही मुद्दे मांडले आहेत.
- २०१६-१७ च्या पूर्वीच्या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेल्या रक्कमेला खर्च म्हणून मान्यता दिली. त्यामुळे सुमारे १०,००० कोटी रुपयांचा दिलासा देशातील साखर कारखान्यांना मिळाला.
- एफआरपीपेक्षा जास्त भाव दिला म्हणून त्या फरकावरील रकमेवर लागू केलेला साडे नऊ हजार कोटी रुपयांचा प्राप्तिकर केंद्र सरकारनं रद्द केला.
- एस डी एफ म्हणजे साखर विकास निधी अंतर्गत घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन होणार
- कारखाना कोलमडला तर शेतकरी कोलमडेल, शेतकरी कोलमडला तर ग्रामीण महाराष्ट्र कोलमडेल… असा महाराष्ट्र मा. अमितभाई शाह यांना कळतो.
- केंद्रीय राखीव पोलीस दलात भरतीची परीक्षा मराठीत घेण्याचा निर्णय अमितभाई शाह यांनी घेतला, असा महाराष्ट्र त्यांना कळतो.
- अहो, पत्रकार पोपटलाल!
छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या महाराष्ट्राच्या महान सुपुत्रांचा इतिहास, बलिदान, योगदान हे मा. अमितभाई शाह यांना कळते ते महान सुपुत्रांच्या चरणी नतमस्तक होतात, असा महाराष्ट्र त्यांना कळतो. - भारतरत्न लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी यांचे योगदान नक्षत्रांचे देणे आहे, हे अमितभाईंना कळते आणि असा महाराष्ट्र त्यांना कळतो!
- आणि हो पोपटलाल बीसीसीआयचे ऑफिस अजूनही मुंबईतच आहे तर मुंबईचा रोहित शर्मा कॅप्टन झाला, अजिंक्य रहाणे व्हाईस कॅप्टन झाला मुंबईचा अजित आगरकर निवड समितीचा अध्यक्ष झाला, असा कळतो त्यांना महाराष्ट्र..
- ही काही वानगीदाखल उदाहरणे.
- मुंबईसाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्यांच्यावर गोळ्या झाडणार्या, हुतात्म्यांचे हात रक्ताने माखलेल्या काँग्रेससोबत तुम्ही सत्तेत बसलात, तुम्हाला मुंबईवर बोलण्याचा अधिकार काय?
“तरीही, कुठे भेटायचे ते ठरवा, सविस्तर समजून घ्यायचे तर आम्ही तयार. प्रभादेवीच्या गल्लीतील पत्रकार पोपटलाल!!”, असं ट्वीट आशिष शेलारांनी केलं आहे.
ठाकरे गटाचा काय प्रश्न होता?
“पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहमंत्री शाह यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. फडणवीस यांनी इतके केले. मग मुख्यमंत्री मिंधे आणि अजित पवार तरी कसे मागे राहतील? त्यांचीही गाडी सुसाट सुटली. शाह यांचा जन्म मुंबईतला, शाह यांनी मुंबईत व्यापार केला आहे, कारखाना चालवला आहे, त्यांना महाराष्ट्र चांगला कळतो, असे प्रशस्तीपत्र फडणवीसांनी द्यावे यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही”, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.