भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी नांदेड येथील गुरुद्वाराला भेट दिली आहे. यावेळी त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान, अमित शाह यांनी नांदेड येथील जाहीरसभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच गेल्या नऊ वर्षाच्या काळात भाजपावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, असंही शाह यांनी सांगितलं.

नांदेड येथील सभेतून अमित शाह यांनी २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलं. २०१९ च्या निवडणुकीत जर एनडीए सरकारला बहुमत मिळालं तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनतील, हे उद्धव ठाकरे यांनी स्वत: मान्य केलं होतं, असा खुलासा अमित शाह यांनी केला.

हेही वाचा- सुप्रिया सुळे की प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचा भावी अध्यक्ष कोण? शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले, “भारतीय जनता पार्टीने प्रत्येक क्षेत्रात विकास केला आहे. आज मी खास महाराष्ट्रात आलो आहे. महाराष्ट्रात अलीकडेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार भाजपा आणि शिवसेनेचं सरकार आहे. ‘धनुष्यबाण’ही शिवसेनेला परत मिळाला आहे. त्यामुळे कोणती शिवसेना खरी आहे? हेही स्पष्ट झालं.”

हेही वाचा- नवीन नियुक्त्या करत शरद पवारांनी अजित पवारांचे पंख छाटले? संजय राऊतांचं थेट विधान, म्हणाले…

“आज मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्यासाठी आलो आहे की, मी भाजपाचा अध्यक्ष होतो, तेव्हा मी आणि देवेंद्र फडणवीस चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो. २०१९ मध्ये ‘एनडीए’ला बहुमत मिळालं तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, हे उद्धव ठाकरेंनी मान्य केलं होतं. पण जेव्हा निकाल लागला आणि एनडीए जिंकली, तेव्हा उद्धव ठाकरेंनी आपलं वचन तोडलं. ते सत्तेसाठी ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले,” अशा शब्दांत अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं.

Story img Loader