राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि इतर संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर सुमारे दोन तास चर्चा केली.
केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाले आहे. सरकारने राबविलेल्या विविध योजनांच्या माहितीसह संघटनात्मक काम, देशभरात गोहत्या बंदी आणि भविष्यातील विविध योजनांसंदर्भात शहा यांनी सरसंघचालकांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपचे नेते संजय जोशी पक्षाअंतर्गत वादामुळे सक्रिय नव्हते. संघाच्या माध्यमातून त्यांच्यावर यापुढे मोठी जबाबदारी देण्याचा विचार आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध बघता त्यांच्या पुनर्प्रवेशाबद्दल चर्चा झाली. संजय जोशी येत्या दोन दिवसांत सरसंघचालकांशी भेट घेणार असल्याची माहिती आहे. याशिवाय देशभरात राबविण्यात आलेल्या आणि भविष्यातील योजना आणि खासदारांचा लेखाजोख्यावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गडकरी वाडा आणि नेत्यांच्या भेटी
एरवी भाजपचे ज्येष्ठ नेते उपराजधानीत आले की, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात सरसंघचालकांशी चर्चा करून परत जातात. मात्र दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सरसंघचालकांशी चर्चा केली आणि त्यानंतर नितीन गडकरी नसताना त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन काही वेळ कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यानंतर आज अमित शहा नागपूरला आल्यावर सरसंघचालकांची भेट घेण्यापूर्वी वाडय़ावर पोहोचल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. उद्या, रविवारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर नागपूरला येणार असून ते गडकरींच्या निवासस्थानी जाणार आहेत. एरवी नागपूरला येऊन गडकरींच्या निवासस्थानी न जाणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते आता वाडय़ावर का जात आहेत, हे मात्र एक कोडे असल्याचे बोलले जात आहे. पूर्ती प्रकरणावरून विरोधी पक्षाने नितीन गडकरींना लक्ष्य करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गडकरी यांनी लोकसभेत त्या संदर्भात आपली बाजू स्पष्ट केली असली तरी विरोधक मात्र अजूनही आक्रमक आहेत.
संजय जोशींच्या पुन:प्रवेशाचा मार्ग मोकळा?
भाजपचे नेते संजय जोशी पक्षाअंतर्गत वादामुळे सक्रिय नव्हते. संघाच्या माध्यमातून त्यांच्यावर यापुढे मोठी जबाबदारी देण्याचा विचार आहे.
First published on: 17-05-2015 at 05:11 IST
TOPICSआरएसएस प्रमुख
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah meets rss chief