Amit Shah Raigad Visit news : देशाचे गृहमंत्री अमित शाह हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार पुण्यतिथी आहे. त्यामुळे अमित शाह हे किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करणार आहेत. रायगडावर जाण्यासाठी ते शुक्रवारीच पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यातील रिट्झ कार्लटन हॅाटेल येथे शाह हे मुक्कामाला आहेत. शासकीय शिष्टाचारानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मुरलीधर मोहोळ स्वागतासाठी उपस्थित होते. रात्री ११ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पुण्यात दाखल झाले. रात्री यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. आता अमित शाह रायगड दौऱ्याच्या दरम्यान काय भाषण करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Amit Shah Raigad Visit Live : अमित शाह आज रायगड दौऱ्यावर, छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार; जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी
Devendra Fadnavis : "छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटावं असं वाटतं, पण…", रायगडावरून फडणवीसांचं वक्तव्य
छत्रपती शिवाजी महाराज देशासह जगासाठी प्रेरणास्थान आहेत-अमित शाह
आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरुन संकल्प करत आहोत की आपल्या स्वातंत्र्याला १०० वर्षे होतील तेव्हा आपला देश जगात क्रमांक एकवर असेल. छत्रपती शिवाजी महाराजानंतर औरंगजेब आला होता तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, संताजी, धनाजी या सगळ्यांनी लढा दिला आणि त्याची कबर इथेच बांधली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका. छत्रपती शिवाजी महाराज देशाला आणि जगाला प्रेरणा देणारे आहेत असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडवण्याचं काम माँ जिजाऊंनी केलं-अमित शाह
छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३४५ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने माझ्यासह मंचावर उपस्थित असलेले देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, उदयनराजे, आशिष शेलार यांच्यासह सगळ्यांचं स्वागत करतो. मी राजमाता जिजाऊंना नमन करतो. त्यांनी फक्त शिवरायांना जन्म दिला नाही तर बाल शिवाजीला त्यांनी स्वराज्य हा विचार दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडवण्याचं काम राजमाता जिजाऊंनी केलं. सुवर्ण सिंहासन ज्या ठिकाणी होतं तिथे मी शिवरायांना अभिवादन केलं त्यावेळी मनात उचंबळून आलेल्या भावना शब्दांत मांडता येणार नाहीत. स्वराज्य, स्वधर्म यासाठी त्यांना आयुष्य वेचलं. आदिलशाही, निजामशाही याने वेढलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बदलण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माच्यावेळी महाराष्ट्र अंधकारात बुडाला होता. स्वधर्म आणि स्वराज्य याबाबत बोलणं लोक गुन्हा समजू लागले होते. पण शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, भगवा फडकवण्यासाठी प्रतिज्ञा घेतली. मी आजवर अनेक नायकांची चरित्रं वाचली आहे. मात्र असं साहस मी एकाहीमध्ये पाहिलं नाही.
महापुरुषांंचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरुन ढकललं पाहिजे हीच आमची भावना-देवेंद्र फडणवीस
उदयन महाराजांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्याबाबत आम्ही योग्य कारवाई करणार आहोत. आमचं तर महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरुन ढकलून द्यावं अशीच आमची भावना आहे. शिवस्मारक सुप्रीम कोर्टात अडकलं होतं. कुठल्याही परिस्थितीत हे स्मारक झालं पाहिजे ही आमची भूमिका असणार आहे. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच दिल्लीत शिवस्मारक झालं पाहिजे ही मागणीही योग्यच आहे. आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांकडे हा विषय घेऊन जाऊ असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अमित शाह शिवरायांचे सेवक आणि इतिहासाचे संशोधक म्हणून आले आहेत-देवेंद्र फडणवीस
राजमाता, राष्ट्रमाता आई जिजाऊ माँसाहेब यांच्या चरणी मी नतमस्तक आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. आज या अभिवादन सोहळ्यात छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी भारताचे गृहमंत्री अमित शाह आलेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारही आले आहेत. उदयनराजे, शिवेंद्रराजे हे देखील आले आहेत यांच्यासह सगळ्याच मान्यवरांचं मी स्वागत करतो आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज मला अतिशय अभिमान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि जगाच्या इतिहासाचा गाढा अभ्यास केला. जगभरातून पुरावे मिळवून लेखन आणि वाचन दोन्ही केलं ते भारताचे गृहमंत्री या ठिकाणी आले आहेत. छत्रपती शिवरायांचे सेवक म्हणून आणि मराठा इतिहासाचे संशोधक म्हणून आले आहेत. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
रायगडावरील भाषणात एकनाथ शिंदेंनीही मांडलं मनोगत
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहिला. तसंच रायगडाने महाराजांचा शेवटचा दिवसही पाहिला. महाराज अवघ्या ५० व्या वर्षी वारले. ते आणखी २० ते ३० वर्षे जगले असते तर आपला सगळा इतिहास बदलून गेला असता असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवरायांचा अपमान केल्यास १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद करा, उदयनराजेंच्या मागण्या काय?
छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा झाली पाहिजे असा कायदा करावा. कुठलाही जामीन त्या व्यक्तीला मिळू नये
छत्रपती शिवाजी महाराजांचा समग्र इतिहासाचं प्रकाशन सरकारने करावं.
सेन्सॉर बोर्डही स्थापन करण्यात यावं. एखादा माणूस कादंबरी लिहितो पण त्याला काही पुरावे नसतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत गैरसमज होतात ते अशा गोष्टींमुळे. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड
छत्रपती शिवाजी महाराजांचं दिल्लीत स्मारक झालं पाहिजे ही देखील शिवभक्तांची मागणी आहे.
शहाजी राजेंची जी समाधी आहे, त्यासाठी पुरेसा निधी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने उपलब्ध करुन द्यावा.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं. राज्यपालांच्या निवासस्थानाजवळ तरी ते स्मारक तयार करण्यात यावं अशी माझी मागणी आहे.
स्वराज्य निर्मिती करुन लोकशाहीचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला -उदयनराजे
मी आज सर्व मान्यवरांच्या वतीने राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करतो. राजधानी रायगड येथे आज छत्रपती शिवरायांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त उपस्थित असलेले अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सगळ्या मान्यवरांचं मी स्वागत करतो असं उदयनराजे भोसलेंनी म्हटलं आहे. सर्व प्रथम आज आपण अत्यंत थोर व्यक्तीपुढे नतमस्तक होण्यासाठी आपण उपस्थित राहिलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव हा विचार दिला. स्वराज्याची स्थापनाही त्यांनी केली. आज लोकशाही आहे, त्या काळात हा विचार छत्रपती शिवरायांनी दिला होता. लोकशाहीचा पाया छत्रपती शिवरायांनी रचला असंही उदयनराजे म्हणाले.
अमित शाह यांनी केलं छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाचं पूजन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाचं पूजन
अमित शाह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रायगडावर दाखल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील महायुतीचे नेते रायगड किल्ल्यावर दाखल झाले आहेत. आज छत्रपती शिवरायांची ३४५ वी पुण्यतिथी आहे. आज त्याच औचित्याने अमित शाह यांचा दौरा मानला जातो आहे. आज अमित शाह काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगडमध्ये दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते रायगड किल्ल्यावर पोहचतील. हेलिकॉप्टरने ते रायगडमध्ये पोहचले आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित असणारर आहेत. रायगड दौऱ्या दरम्यान अमित शाह काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यात राजकीय विषय काही नाही-सुनील तटकरे
आपल्याकडे देशाचे नेते येतात तेव्हा त्यांचं स्वागतच केलं जातं. अमित शाह रायगड दौऱ्यावर आहेत. ते शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत. या सगळ्यामध्ये पालकमंत्री पदाचा विषय असण्याचं काही कारण नाही. काहीही राजकीय चर्चा असण्याचं कारण नाही असं खासदार सुनील तटकरेंनी म्हटलं आहे. तसंच महायुतीच्या नेत्यांचं स्नेहभोजनही आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली अमित शाह यांच्या कार्यक्रमाची पोस्ट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धार केला जाणार आहे. या कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित असतील अशी पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
कसा असेल अमित शाह यांचा दौरा?
सकाळी १० वाजता - पुण्यातील विमानतळावरुन पाचाडकडे रवाना
१०.३० वाजता - पाचाड येथे जिजाऊंच्या स्मारकाला भेट
११ वाजता रोपवेने रायगडासाठी रवाना होणार
११.३० वाजता रायगडावर दाखल, विविध कार्यक्रमात सहभाग
दुपारी १२.३० वाजता शिवरायांना अभिवादन करतील
२ ते 3 वाजता सुनील तटकरेंच्या सुतारवाडीतील निवासस्थानी स्नेहभोजन
३ वाजता मुंबईत दाखल होणार
४ ते ६ विलेपार्लेत चित्रलेखा साप्ताहिकाचा कार्यक्रम
संध्याकाळी ६.३० वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
रात्री सह्याद्री अतिथीगृहावर मुक्काम, मुख्यमंत्री फडणवीसांसोब बैठकीची शक्यता
रायगडमध्ये अमित शाह यांच्या स्वागताचे फलक
रायगडमध्ये अमित शाह यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आल्याचं दिसून येतं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगडावर जाणार आहेत. त्यावेळी ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान रायगडमधले हे स्वागत फलक लक्ष वेधून घेत आहेत.
अमित शाह सुनील तटकरेंच्या घरी भोजनासाठी जाणार
गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्य महायुतीत काहीशी चलबिचल होताना दिसत आहे. त्याला कारण ठरलं आहे ते रायगडचं पालकमंत्रिपद. त्या अनुषंगाने गाठीभेटी होतानाही दिसत आहे. दरम्यान आज (शनिवारी) अमित शाह रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत. त्यानंतर मुंबईत त्यांचे कार्यक्रम आहेत. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भोजनाला जाणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
देशाचे गृहमंत्री अमित शाह हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार पुण्यतिथी आहे. त्यामुळे अमित शाह हे किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करणार आहेत.