Chhatrapati Shivaji Maharaj 345 Death Anniversary Raigad : महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीची कार्यक्रम किल्ले रायगड या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत त्यांचे विचार मांडले. तसंच शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्व हे देश आणि जगाला प्रेरणा देणारं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले अमित शाह?
छत्रपती शिवरायांच्या पुण्यतिथीच्या या कार्यक्रमाला बोलवण्यात आलं हे मी माझं भाग्य समजतो. मी राजमाता जिजाऊंना नमन करतो. त्यांनी फक्त शिवरायांना जन्म दिला नाही तर बाल शिवाजीला त्यांनी स्वराज्य हा विचार दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडवण्याचं काम राजमाता जिजाऊंनी केलं. सुवर्ण सिंहासन ज्या ठिकाणी होतं तिथे मी शिवरायांना अभिवादन केलं त्यावेळी मनात उचंबळून आलेल्या भावना शब्दांत मांडता येणार नाहीत. मी अशा व्यक्तीच्या राज दरबरात उभा होतो ज्या व्यक्तीने स्वराज्य, स्वधर्म यासाठी त्यांना आयुष्य वेचलं. आदिलशाही, निजामशाही याने वेढलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बदलण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. स्वराज्याचं स्वप्न यशस्वी झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माच्यावेळी महाराष्ट्र अंधकारात बुडाला होता. स्वराज्याची कल्पनाही कुणी करत नव्हतं. स्वधर्म आणि स्वराज्य याबाबत बोलणं लोक गुन्हा समजू लागले होते. पण शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, भगवा फडकवण्यासाठी प्रतिज्ञा घेतली. मी आजवर अनेक नायकांची चरित्रं वाचली आहे. मात्र असं साहस आणि दृढ इच्छाशक्ती, अकल्पनीय रणनीती मी एकाही व्यक्तीमध्ये पाहिलं नाही. असं अमित शाह म्हणाले.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य ही संकल्पना जगली आहे-अमित शाह
छत्रपती शिवाजी महाराजांकडे धन नव्हतं, भूतकाळ त्यांच्यासह नव्हता, भविष्याबाबत काही माहिती नव्हतं. मात्र स्वराज्य या संकल्पनेतून त्यांनी ते निर्माण करुन दाखवलं आणि पाहता पाहता १०० वर्षांपासून सुरु असलेली मोगालाई संपुष्टात आणून दाखवली. अटकेपर्यंत शिवाजी महाराजांचे मावळे पोहचले, तामिळनाडू, बंगालपर्यंत पोहचले तेव्हा लोकांनी सुस्कारा सोडला की आता आपला देश, आपली संस्कृती वाचली. आज आपण संकल्प सोडू की स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा आपला देश सगळ्याच आघाड्यांवर क्रमांक १ ला उभा असेल. या विचारांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला आहे. जिजाऊंनी छत्रपती शिवरायांमध्ये स्वराज्याचं बीज रोवलं. त्याचा पुढे वटवृक्ष झाला. शिवाजी महाराजानंतर औरंगजेब आला होता तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, संताजी, धनाजी या सगळ्यांनी लढा दिला आणि त्याची कबर इथेच बांधली गेली.
माझी महाराष्ट्रातल्या लोकांना हात जोडून विनंती आहे-अमित शाह
मी महाराष्ट्रातल्या लोकांना हात जोडून विनंती करतो की शिवरायांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका. देश आणि सगळं जग शिवरायांपासून प्रेरणा घेऊ शकतं. स्वधर्म, स्वराज्य आणि स्वभाषा अमर करणं हे तीन विचार देशाच्या सीमेशी जोडलेले नाहीत तर माणसाच्या स्वाभिमानाशी जोडले गेले आहेत. त्यांनी अशा कालखंडात हे विचार ठेवले जेव्हा आक्रमण करणाऱ्यांनी आपल्याला परास्त केलं होतं. आपण गुलामीच्या मानसिकतेत गेलो होतो. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदवी स्वराजाच्या सूर्य दैदिप्यमान केला. मी जेव्हा इथे भाषण करायला किंवा राजकारण करायला आलो नाही. मला शिवरायांच्या स्मृतींची अनुभूती व्हावी म्हणून आलो आहे असंही अमित शाह म्हणाले.
छत्रपतींचा राज्याभिषेक झाला तो हाच रायगड किल्ला. ज्या किल्ल्यावर छत्रपतींनी अखेरचा श्वास घेतला तो किल्लाही हाच. ही पवित्र भूमी आपल्याला इतिहास सांगणारी आहे. ही पवित्र भूमि शिवस्मृती करण्यासाठी मी लोकमान्य टिळकांचेही आभार मानतो. इंग्रजांनी रायगड किल्ला जाणीवपूर्वक तोडण्याचं काम केलं. कारण हा किल्ला वर्षानुवर्षे स्वराज्याचं प्रतीक होतं. दीर्घ काळ गुलामीत ठेवण्यासाठी हे प्रतीक तोडण्यात आलं मात्र लोकमान्य टिळकांनी या स्मारकासाठी कष्ट घेतले. तसंच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हेदेखील ते म्हणाले त्यामागची प्रेरणाही छत्रपती शिवाजी महाराजच होते असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.