देशभर रंगोत्सवाची धामधूम सुरू असताना उपराजधानीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि इतर संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर सुमारे साडेनऊ तास बंदद्वार दिर्घ चर्चा झाली. या चर्चेत संघाच्या प्रतिनिधी सभेत चर्चेला येणाऱ्या विविध विषयांपासून ते भाजपसंबंधित आणि देशभरातील विविध घडामोडींबाबत उहापोह झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रतिनिधी सभेपूर्वी संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांशी चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.  
रा. स्व. संघाच्या शिखर संस्थेची १२ ते १५ मार्च दरम्यान होणाऱ्या अ.भा. प्रतिनिधी सभेच्या पाश्र्वभूमीवर अमित शहा यांचे धुलिवंदनाच्या दिवशी सकाळी नागपुरात आगमन झाल्यावर ते संघ कार्यालयात आले. सकाळी १० वाजता सुरू बैठक सुरू झाल्यानंतर शहा यांनी प्रारंभी सरकार्यवाह भैय्याजी जोशी, पदाधिकारी इंद्रेशकुमार आणि सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत बंदद्वार चर्चा झाल्याची माहिती आहे. सरसंघचालकांशी चर्चा झाली त्यावेळी अमित शहा यांच्यासोबत पक्षाचे ज्येष्ठ नेते रामलाल उपस्थित होते. दिल्लीत भाजपचा झालेला पराभव, केंद्र सरकारने घेतलेले निर्णय आणि संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, भाजपाचे नेते संजय जोशी गेल्या दोन वर्षांत पक्षात असले तरी गेल्या काही वर्षांत ते पक्षातील अंतर्गत वादामुळे सक्रिय नव्हते. त्यामुळे आगामी काळात त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्र सरकारने सत्ता स्थापन झाल्यानंतर देशभरात विकासाच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या योजना, खासदारांचा लेखाजोख्यावरही सरसंघचालकांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.  
दरम्यान, अमित शहा यांचे सकाळी सात वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाल्यावर ते रविभवनला गेले. सकाळी पावणे दहा वाजता ते महालातील रा. स्व. संघाच्या मुख्यालयात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रेशखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके आणि खासदार अजय संचेती उपस्थित होते. मात्र, संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू झाली त्यावेळी सर्व नेत्यांना जाण्यास सांगितले.
संघ कार्यालयातून सायंकाळी सात वाजता ते बाहेर पडले आणि रविभवनला जाऊन त्यांनी भाजपचे स्थाानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सवांद साधल्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले.
संघ कार्यकारिणीत बदल?
रा. स्व. संघाच्या कार्यकारिणीत फेरबदल होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात भारतीय मजदूर संघाने केंद्र सरकारच्या विरोधात घेतलेली भूमिका, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांची वादग्रस्त विधाने, जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीसोबत युती, देशभरात गोहत्या बंदी आदी विषयावर सरसंघचालकांशी चर्चा झाल्याची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा