महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. जून २०२२ मध्ये शिवसेना पक्ष फुटून दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदारांना आपल्याबरोबर घेत वेगळा गट बनवला, तसेच मूळ शिवसेनेवर दावा केला. निवडणूक आयोगाने त्यांच्या गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यतादेखील दिली आहे. दरम्यानच्या काळात राज्यातलं उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यासह महायुतीचं सरकार स्थापन केलं. त्यानंतर एक वर्षाने जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडले. पक्षातील ४१ आमदारांना आपल्याबरोबर घेत अजित पवारांनी वेगळा गट बनवला आणि मूळ पक्षावर दावा केला. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या गटाला मूळ राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. हे दोन पक्ष फुटल्यापासून भाजपानेच हे दोन्ही पक्ष फोडल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमित शाह म्हणाले, महाराष्ट्रातील कुठलाही पक्ष भाजपाने फोडला नाही. खरंतर, पुत्र आणि कन्येच्या मोहापायी हे पक्ष फुटले. अमित शाह काही वेळापूर्वी इंडिया टूडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते. यावेळी शाह यांनी सांगितलं की, लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जागांचं वाटप पूर्ण झालं आहे. आम्हा तिन्ही पक्षांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही.

अमित शाह यांना यावेळी विचारण्यात आलं की, तुम्ही महाराष्ट्रातील पक्ष फोडून महायुती बनवली आणि सरकार स्थापन केलं. परंतु, राजकीय विश्लेषक आणि काही लोकांची उद्धव ठाकरे आणि शरद पवारांप्रती सहानुभूती दिसतेय. त्यामुळे तुम्हाला किती विश्वास आहे की, महाराष्ट्रात एनडीए चांगली कामगिरी करेल? यावर शाह म्हणाले, भाजपाने हे पक्ष फोडले या वक्तव्याशी मी सहमत नाही. आम्ही कोणताही पक्ष फोडला नाही. पूत्र प्रेमामुळे आणि मुलीवरील प्रेमामुळे काही पक्षांमध्ये फूट पडली आहे.

अमित शाह म्हणाले, उद्धव ठाकरेंची इच्छा होती की आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, त्यामुळेच त्यांच्या पक्षातला एक मोठा गट पक्षापासून विभक्त झाला. कारण त्यांना आदित्य ठाकरेंचं नेतृत्व मान्य नव्हतं. बाळासाहेब ठाकरेंपासून पक्षासाठी काम करणाऱ्या लोकांनी आधी उद्धव ठाकरेंचा स्वीकार केला. आता त्याच लोकांनी आदित्य ठाकरेंचादेखील स्वीकार करावा का? हे त्या नेत्यांना मान्य नव्हतं.

हे ही वाचा >> तुम्हालाही पैसे मागितलेले? राजकीय पक्षांना कोट्यवधींचं दान देणाऱ्या उद्योजिकेचं थेट उत्तर, म्हणाल्या…

अमित शाह म्हणाले, दुसऱ्या बाजूला शरद पवारदेखील त्यांच्या मुलीला पक्षाच्या नेत्या बनवू इच्छित होते. परंतु, पक्षातील अनेक वरिष्ठ नेते या मताशी सहमत नव्हते. आम्ही कुठलाही पक्ष फोडला नाही. पूत्र आणि कन्येच्या मोहानेच शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फोडले. हेच वास्तव आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah says bjp didnt broke shivsena ncp party split because of leaders asc