भारतीय जनता पार्टी सध्या देशभर लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत आहे. तसेच भाजपा नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारालादेखील सुरुवात केली आहे. यांतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज (५ मार्च) जळगाव येथे सभा पार पडली. या सभेत बोलताना अमित शाह यांनी मतदारांना पुन्हा एकदा भाजपाला मत देऊन नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यास सहकार्य करा, असं आवाहन केलं. तसेच शाह यांनी यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली. तसेच महाविकास आघाडीला तीन चाकांची रिक्षा संबोंधलं. ही रिक्षा पंक्चर झालेली असून महाराष्ट्राचा विकास करणार नाही, असं वक्तव्य शाह यांनी यावेळी केलं.
अमित शाह म्हणाले, मी शरद पवारांना सांगेन की, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनून केवळ १० वर्षे झाली आहेत. या १० वर्षांमध्ये आम्ही देशाचा खूप विकास केला. परंतु, अवघा महाराष्ट्र गेल्या ५० वर्षापासून शरद पवारांचं ओझं वाहतोय. महाराष्ट्र त्यांना सहन करतोय. त्या ५० वर्षांचा राहू देत, परंतु तुम्ही तुमच्या पाच वर्षांचा हिशेब द्या. मी मोदी सरकारच्या काळातील दहा वर्षांचा हिशेब द्यायला इथे आलो आहे.
इंडिया आघाडितले सगळे पक्ष स्वार्थी आहेत. प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला आपापल्या मुलांना मंत्री, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान करायचं आहे. त्यांच्यातल्या सर्व पक्षांमध्ये घराणेशाही चालते. सोनिया गांधी यांना त्यांच्या मुलाला म्हणजेच राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं आहे. शरद पवारांना त्यांच्या मुलीला म्हणजेच सुप्रिया सुळे यांना मंत्री करायचं आहे. उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला म्हणजेच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं आहे, एम. के. स्टॅलिन यांना त्यांच्या मुलाला उदयनिधींना मुख्यमंत्री बनवायचं आहे.
अमित शाह म्हणाले, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांचं सरकार होतं तेव्हा रोज बॉम्बस्फोट व्हायचे. दहशतवादी भारतात येऊन हल्ले करून, बॉम्बस्फोट करुन पळून जायचे. परंतु, आपल्याकडून त्यांना काहीच प्रत्युत्तर दिलं जायचं नाही. मग मोदींचं सरकार आलं मग उरी आणि पुलवामामध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला. दहाच दिवसात पाकिस्तानच्या घरात घुसून आपण सर्जिकल स्टाईक आणि एअर स्ट्राईक करुन आतंकवाद्यांना संपवलं. आपल्या सरकारने काश्मीरचा प्रश्न सोडवला. काश्मीर आपला आहे की नाही? काश्मीर भारताचा भाग आहे की नाही? मोदींनी काश्मीरला भारताशी जोडलं. काँग्रेसने कलम ३७० हे ७० वर्षांपासून लटकवत ठेवलं होतं. आम्ही ते काढून टाकलं.
हे ही वाचा >> “महाराष्ट्रातली महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर रिक्षा..” , अमित शाह यांचा हल्लाबोल
अमित शाह जनतेला संबोधित करताना म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाला संधी द्या. पंतप्रधान मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था ११ व्या नंबरवरून पाचव्या नंबरवर आणली आहे, ती आपल्याला तिसऱ्या नंबरवर न्यायची आहे. काँग्रेसला जे ७० वर्षांमध्ये जमलं नाही ते आम्ही १० वर्षांमध्ये करून दाखवलं आहे. त्यांनी व्होट बँकेसाठी ७० वर्षे रामलल्लांना तंबूत ठेवलं. परंतु, आमच्या सरकारने रामलल्लांचं मंदिर बांधून दाखवलं.