भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नुकतंच पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांनी मोदी @२० पुस्तकाचं प्रकाशन केलं. या कार्यक्रमातून अमित शाह यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, त्यांनी निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्हावर दिलेल्या निर्णयाचं स्वागत केलं. काल निवडणूक आयोगानं ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ केलं, अशा शब्दात अमित शाह यांनी निशाणा साधला.
यावेळी अमित शाह म्हणाले, “काल निवडणूक आयोगानं ‘दूध का दूध और पानी का पानी’ केलं. काल ‘सत्यमेव जयते’ हे सूत्र महत्त्वाचं ठरलं. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व लोकसभा मतदार संघाच्या विजयसाठी संकल्प करा, असं आव्हान अमित शाह यांनी केलं. यानंतर आमित शाह यांनी संबंधित कार्यक्रमातून ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.
हेही वाचा- “…तर मी मरून जाईल, कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहावी लागेल”, अजित पवार असं का म्हणाले?
दरम्यान, अमित शाह यांनी यूपीए सरकारवर निशाणा साधला. २००४ ते २०१४ या कालावधीत देशात युपीएचं सरकार होतं. या सरकारमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काहीही निर्णय घ्यायचा असेल तर धोरण लकवा झाला होता. या कालावधीत जे सरकार होतं त्या सरकारमधले सगळे मंत्री स्वतःला पंतप्रधान समजत होते आणि पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंह यांना कुणीही पंतप्रधान समजत नव्हतं, अशी टीका अमित शाह यांनी पुण्यात केली.
हेही वाचा- ठाकरे गटाकडून नवीन चिन्हासाठी हालचाली; संजय राऊतांचं थेट विधान, म्हणाले…
यूपीए सरकारच्या काळात दहशतवादी रोज आपल्यावर हल्ला करू लागले होते. लष्कराच्या जवानांना त्रास देत होते. विदेशातही आपल्या देशाचे पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंह यांना काही सन्मान नव्हता. २०१४ च्या निवडणुका लागल्या तेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. त्यावेळी मोदी लाट आली आणि संपूर्ण देशाने मोदींना निवडून दिलं. २०१४ मध्ये जेव्हा भाजपाचं सरकार आलं तेव्हापासून आजपर्यंत अनेक प्रकाराचं चांगलं परिवर्तन देशात झालं, असंही अमित शाह यांनी म्हटलं.