केंद्रीय निवडणूक आयोग कधीही लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आणि राजकीय आघाड्या कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. जागावाटप हा सध्या सर्व आघाड्यांमधला ऐरणीवरचा विषय ठरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असून यादरम्यान त्यांनी भाजपाच्या महाराष्ट्रातील मित्रपक्षांशी, अर्थात शिंदे गट व अजित पवार गट यांच्याशी प्रदीर्घ बैठका केल्या आहेत. या बैठकांमध्ये बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली? नेमकं काय ठरलंय? याविषयी सध्या तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी अमित शाह यांची जळगाव आणि औरंगाबादमध्ये सभा झाली. यानंतर रात्री उशीरापर्यंत अमित शाह यांची सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जागावाटपाबाबत चर्चा चालू होती. विशेष म्हणजे बुधवारी सकाळी पुन्हा एकदा त्यांची बैठक झाल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे बंद दाराआड चाललेल्या जागावाटपाच्या या चर्चांमधील घडामोडींवर जोरदार चर्चा सध्या पाहायला मिळत आहे.

काय झालं बैठकीत?

इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार जागावाटपाबाबत तिन्ही पक्षांमध्ये जवळपास एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये भाजपाकडून सातत्याने ३२ जागांसाठी आग्रह धरला जात असून अजित पवार गटाला तीन जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी मात्र १० जागा दिल्या जातील असं सांगितलं जात आहे. त्याव्यतिरिक्त शिंदे गट व अजित पवार गटातील काही उमेदवार भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यताही या वृत्तात व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, या बैठकीत अमित शाह यांनी शिंदे गट व अजित पवार गटाला जागावाटपामध्ये वाजवी मागण्या करण्याचा सल्ला दिल्याचं इंडिया टुडेनं वृत्तात म्हटलं आहे.

भाजपाची पहिली यादी जाहीर

भारतीय जनता पक्षाकडून १९५ उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नव्हतं. त्यामुळे महायुतीतील जागावाटपामध्ये तिढा निर्माण झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, मंगळवारी अमित शाह यांच्याशी झालेल्या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटल्याचं बोललं जात आहे.

अजित पवार गटाकडे सध्या एक विद्यमान खासदार

जिंकून येण्याचा निकष लावूनच उमेदवारी देण्यात येणार असल्याचं भाजपाकडून सातत्याने स्पष्ट केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडे सुनील तटकरेंच्या रुपात एकच विद्यमान खासदार असल्यामुळे त्यांच्या गटाला महायुतीत सर्वात कमी जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.