Mahim Constituency Update News : राज्यात मतदानाला सुरुवात झाली असून सर्वपक्षीय उमेदवारही मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. सेलिब्रिटींसह सामान्य नागरिकही मतदानासाठी रांगेत उभे आहेत. दरम्यान, मतदानानंतर अनेक उमेदवार माध्यमांशी संवाद साधत असून नागरिकांनी बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहेत. राज्यातील माहीम विधानसभा मतदारसंघ सध्या हायवोल्टेज मतदारसंघ ठरला आहे. कारण, या मतदारसंघातून राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे उभे आहेत. तर, त्यांच्याविरोधात विद्यमान आमदार सदा सरवणकर निवडणूक लढवत आहेत. हे दोघेही प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात पहिल्यांदाच आमने सामने आले आहेत. एबीपी माझाच्या मुलाखतीत हे दोघे आज एकत्र दिसले. त्यावेळी अमित ठाकरेंनी केलेल्या कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
मी कधीच काहीच मागत नाही
आज मतदानाच्या निमित्ताने मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात अमित ठाकरे आणि सदा सरवणकर दर्शनाकरता गेले होते. यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मंदिरात बाप्पाकडे काय मागितलं असं विचारलं असता अमित ठाकरे म्हणाले, “मी बाप्पाकडे काही मागत नसतो. अशा महत्त्वाच्या प्रसंगी मी मंदिरात येतो. बाप्पाने मला आधीच खूप काही दिलंय. फक्त मी आशीर्वाद घेण्याकरता येथे आलो आहे. “
हेही वाचा >> Raj Thackeray: वरळी विधानसभेत व्हायरल झालेल्या पत्रावर राज ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही शिंदे गटाला…”
अमित ठाकरे आणि सदा सरवणकरांनी दिलेल्या एकमेकांना शुभेच्छा
माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना त्यांच्या समोरच सदा सरवणकरही माध्यमांशी बोलत होते. तेवढ्यात माध्यम प्रतिनिधींनी या दोघांचीही भेट घालून दिली. दोघांनीही एकमेकांकडे पाहून हस्तांदोलन केलं अन् एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. सदा सरवणकर म्हणाले, “मी सर्वच उमेदवारांना मन:पुर्वक शुभेच्छा देतो. हा लोकशाहीचा महोत्सव आहे. यात सर्वंच उमेदवार जिंकता आले असते तरी चांगलं झालं असतं. एकनाथ शिंदेंसारखा दयावान आणि गोरगोरीबांची दया असणारा व्यक्ती पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत”, असं सदा सरवणकर म्हणाले. तर, ” मी माझे १०० टक्के दिले आहेत. त्यांनीही त्यांचे १०० टक्के दिले असतील. त्यामुळे त्यांनाही खूप खूप शुभेच्छा.”
अमित ठाकरेंच्या कृतीने वेधलं लक्ष
दरम्यान, शुभेच्छा दिल्यानंतर अमित ठाकरेंचं लक्ष सदा सरवणकर यांच्या खिशाला लावलेल्या धनुष्यबाणावर गेलं. त्यांच्या खिशावरील धनुष्यबाण खालच्या बाजूने झुकलं होतं. त्यामुळे लागलीच अमित ठाकरे यांनी ते सरळ केलं आणि ते पुढे निघाले. आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या चिन्हाचा मान त्यांनी राखल्याने त्यांच्या कृतीकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं.