समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर मनसेचे नेते अमित ठाकरे यांचं वाहन काही काळ थांबवून ठेवल्याच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (२३ जुलै) मध्यरात्री टोलनाक्याची तोडफोड केली होती. अमित ठाकरे हे शिर्डीहून मुंबईला येत असताना सिन्नर तालुक्यातील गोंदे टोल नाक्यावर हा प्रकार घडला. या घटनेपासून अमित ठाकरे हे नाव चर्चेत आहे. दरम्यान, हा टोलनाका फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. परंतु त्यांना आता जामीन मिळाला आहे. या कार्यकर्त्यांना जामीन मिळताच अमित ठाकरे यांनी नाशिकला जाऊन त्यांची भेट घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमित ठाकरे यांनी टोलनाका फोडणाऱ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. तसेच ते म्हणाले, प्रत्येकाने टोल फोडावा असं माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की, व्यवस्थेला एक मेसेज देणं गरजेचं आहे. टोलनाक्यांवर सामान्य नागरिकांची हेळसांड होते. हे लोक (टोलनाका चालवणारे) ज्या प्रकारे बाऊन्सर्स ठेवून टोल नाक्यावर वसुली करतात. माझा विचार सोडून द्या, या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा विचार करा. मी इथे आल्यावर तेच केलं. सामान्य नागरिकांना काय त्रास होत असेल याचा विचार केला.

अमित ठाकरे म्हणाले, अनेकदा बातम्यांमध्ये पाहायला मिळतं, टोल नाक्यावरील बाऊन्सरने महिलांवर हात उचलला, किंवा बाऊन्सर्स महिलांशी उद्धटपणे वागले. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यांची ही दादागिरी थांबली पाहिजे. हा मेसेज जाणं गरजेचं होतं. हा मेसेज देण्यासाठी मुद्दाम तोडफोड केली नाही. पण अनायसे तसं घडलंय तर ठीक आहे.

हे ही वाचा >> “अमित महाराष्ट्रभर टोलनाके…”, तोडफोडीच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मनसे नेते अमित ठाकरे म्हणाले, चांगले रस्ते आणि सुविधांसाठी आपण टोल भरतोच, त्याव्यतिरिक्त आणि इतर ८ ते १० प्रकारचे कर भरतो. पण तरीदेखील आपल्याला कसले रस्ते मिळतात? तुम्ही आपल्या रस्त्यांची परिस्थिती पाहा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit thackeray angry at toll collection system bouncers and potholes on roads asc
Show comments