उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिला. बिनशर्त पाठिंबा दिल्याची खिल्ली उद्ध ठाकरेंनी ‘बिनशर्ट’ पाठिंबा असं म्हणत उडवली. या टीकेनंतर मनसे चांगलीच आक्रमक झालेली पाहण्यास मिळाली. आता तर उद्धव ठाकरेंचा पुतण्या आणि राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे यांनी याबाबत भाष्य केलं.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
“या लोकसभा निवडणुकीमुळे मित्र कोण आणि शत्रू कोण हे समोर आलं आहे. काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून ‘बिन-शर्ट’ पाठिंबा दिला. उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला. तर काही जणांनी भाजपाला विरोध करण्याचे नाटक करून पाठिंबा दिला. मात्र, आम्ही नाटक करणारी माणसं नाही. नाटक ही कला आहे. आणि ही कला मोदींना जमते आम्हाला जमत नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरे यांनी जो बिनशर्त पाठिंबा दिला त्यावरुन उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावला. यावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली. तर आता अमित ठाकरेंनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं.
हे पण वाचा- “काही लोक पांचट जोक मारत आहेत, पण…”, उद्धव ठाकरेंच्या बिनशर्ट पाठिंब्याच्या टीकेनंतर मनसेचा पलटवार
राजू पाटील काय म्हणाले?
कंबरेचं काढून डोक्याला गुंडाळलेले ‘शर्त” आणि ‘शर्ट’ असले फुटकळ शब्दच्छल करतात. ‘दादू’ काहीच दिवसांपूर्वी आपणही मोदीजींनाच पाठिंबा दिला होतात तेव्हा काय काढलं होतंत ? #लब्बाडलांडगंढ्वांग_करतंय अशी पोस्ट राजू पाटील यांनी केली आहे. तसंच उद्धव ठाकरेंचं एक भन्नाट व्यंगचित्रही त्याबरोबर पोस्ट केलं आहे. ही पोस्ट आता चांगलीच चर्चेत आली आहे.
अमित ठाकरे काय म्हणाले?
“उद्धव ठाकरेंचा विनोद मला कळायलाही दहा मिनिटं लागली. वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काही वाटलं नाही. तेव्हा त्यांनी तो घेतला आणि मुलाला आमदार केलं. पण या गोष्टी विसरायला नकोत. राज ठाकरेंनी जो पक्ष काढला आहे तो स्वतःच्या मेहनतीवर काढला आहे. पक्ष मोठा व्हायला वेळ लागला असेल तरीही तो आपल्या मेहनीतवर काढलेला पक्ष आहे हे कुणी विसरु नये. विधानसभा निवडणुकीत आम्ही आमची शक्ती दाखवू.” असं म्हणत अमित ठाकरेंनी काका उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आहे.
शेवटचे तीन-चार महिने फिरुन काही होत नाही
आमदार निवडून दिला की त्याच्याकडे काम करण्यासाठी पाच वर्षे असतात. कोव्हिड काळात वरळी मतदारसंघात कुणीही फिरकलं नाही. आता शेवटचे तीन-चार महिने फिरुन फारसा काही फरक पडणार नाही. आम्ही बिनशर्त पाठिंबा यासाठी कुणालाच दिला नव्हता. असं म्हणत अमित ठाकरेंनी आदित्य ठाकरेंनाही टोला लगावला आहे.