Dadar Mahim Vidhan Sabha Constituency : दादर – माहीम विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. या मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेले. त्यांना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे महेश सावंत आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचे आव्हान होते. हे आव्हान त्यांना पेलवता आले नाही. कारण त्यांचे निवासस्थान असलेल्या या मतदारसंघातून त्यांचा दारूण पराभव झाला आहे. अमित ठाकरेंनी शिक्षण, आरोग्य, क्रीडा, पाणी व रहदारीशी संबंधित समस्या सोडविणे, जुन्या चाळी व इमारतींचा पुनर्विकास, छत्रपती शिवाजी महाराज पार्क धूळमुक्त आदी मूलभूत व पायाभूत सुविधा देण्याच्या मुद्द्यांवर भर दिला असून भविष्यात यासंबंधित विविध कामे करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यातून दिले होते. परंतु, तरीही अमित ठाकरेंची जादू चालली नाही. तर, उद्धव ठाकरे यांचा शिलेदार महेश सावंत विजयी ठरले आहेत. त्यामुळे ते जायंट किलर ठरलेत.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांना ५० हजार २१३ मते मिळाली असून त्यांनी १३१६ मतांनी विजय मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे सदा सरवणकर असून त्यांना ४८ हजार ८९७ मते मिळाली आहेत. तर, राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना अवघे ३३ हजार ६२ मते मिळाली असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघातील इतर उमेदवारांना अवघे तीन अंकी मते मिळाली आहे.
ठाकरे कुटुंबातील पहिला पराभव
ठाकरे कुटुंबातून आदित्य ठाकरे यांनी २०१९ साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. या कुटुंबातून निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे पहिले सदस्य होते. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना विजय मिळाला आणि महाविकास आघाडीच्या सत्तेत मंत्रिपदही मिळाले. दरम्यान, २०२४ च्या निवडणुकीत अमित ठाकरेंनीही माहिम विधानसभा मतदारसंघातून आपलं नशीब आजमावले. परंतु, त्यांच्या पदरी निराशा आली. त्यामुळे ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढवणारे दुसरे सुपुत्र मात्र अपयशी ठरले आहेत.
माहिम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे…
— Amit Thackeray (@amitrthackeray) November 23, 2024
आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो. pic.twitter.com/0zLkpi7ZNQ
युवा पिढीसाठी शैक्षणिक उपक्रम, शाळा व महाविद्यालयांत कायमस्वरूपी समुपदेशकाची नेमणूक, स्थानिक तरुणांना खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळण्यासाठी पाठपुरावा, ज्येष्ठ नागरिक कल्याण योजना, आरोग्य, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्राशी संबंधित कामे करण्याचे आश्वासन अमित यांनी जाहीरनाम्यातून दिले होते. तसंच, राज ठाकरेंचा सुपुत्र म्हणून जनतेकडून त्यांच्याप्रती एक वेगळी सहानुभूती होती. त्यामुळे सदा सरवणकरांविरोधात त्यांना टफ फाईट मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली. परंतु, निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपडेट झालेल्या आकडेवारीनुसार अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
अमित ठाकरेंची जादू चालली नाही?
मच्छिमार वसाहत इमारतींचा पुनर्विकास, माहीम पोलीस वसाहतींमधील पोलीस बांधवांना सुरक्षित घरे, पाण्याशी संबंधित समस्या सोडविणे, छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाचा विकास, धुळीपासून मुक्तता, चांगले व उत्तम दर्जाचे रस्ते, अंमली पदार्थमुक्त मतदारसंघ व महिलांना सुरक्षित वातावरण, जुन्या चाळी व इमारतींचा पुनर्विकास, मिठी नदीची साफसफाई व सौंदर्यीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे अमित ठाकरे यांनी जाहीरनाम्यात नमूद केले होते. स्थानिक समस्या लक्षात घेऊन त्या सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतरही अमित ठाकरेंच्या बाजूने कमी जनकौल राहिल्याचं स्पष्ट होतंय.