Amit Thackeray Files Nomination Form: मुंबईच्या ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी माहीम व वरळी या मतदारसंघांची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. या मतदारसंघांमध्ये ठाकरे घराण्याची तिसरी पिढी अर्थात अनुक्रमे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे व उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे राजकीय वर्तुळात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी व त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांचीही चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज माहीम विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी अमित ठाकरेंनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरेंवर टीका करतानाच अमित ठाकरेंनी इतरही मुद्द्यांवर दिलखुलासपणे उत्तरं दिली.

मतदारसंघात पायी फिरताना दिसले अमित ठाकरे

आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अमित ठाकरे मतदारसंघात पायी फिरताना दिसून आले. याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, “मला या गोष्टी करायला आवडतात. गणेश उद्यानातही मी पायी फिरतो. मी शिवाजी पार्कला राऊंड मारताना या गोष्टी करतोच. गणेश उद्यान, महाराजांना अभिवादन वगैरे करतो”, असं ते म्हणाले. तसेच, “मी उमेदवारीबाबत देवाला काहीच साकडं घातलेलं नाही. मी देवाकडे कधीच काही मागितलेलं नाही. त्यानं मला खूप काही दिलेलं आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.

अमित ठाकरे यांची आदित्य ठाकरेंवर टीका (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम/एएनआय)

सदा सरवणकरांच्या अर्जाचं काय?

दरम्यान, अमित ठाकरेंना माहीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विद्यमान आमदार व शिवसेना (एकनाथ शिंदे) उमेदवार सदा सरवणकर त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. समाधान सरवणकरांनी २९ ऑक्टोबरला अर्ज भरला जाणार असल्याचं व्हॉट्सअॅप स्टेटसवर लिहिलं असताना दुसरीकडे शिंदे गटाकडून सदा सरवणकरांना अर्ज मागे घेण्याची विनंती केल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंना याबाबत विचारणा केली असता आपल्याला त्याबाबत माहिती नसल्याचं ते म्हणाले.

Amit Thackeray: ‘राजपुत्रा’ची ‘उद्धवपुत्रा’वर थेट टीका; अमित ठाकरे म्हणाले, “तुम्ही लोकप्रतिनिधी असाल…”

‘बाईट’ची वाटते धाकधूक!

दरम्यान, यावेळी माध्यम प्रतिनिधींनी अर्ज भरतेवेळी धाकधूक वाटते का? अशी विचारणा केली असता त्यावर अमित ठाकरेंनी मिश्किल शब्दांत उत्तर दिलं. “मला अर्ज भरताना धाकधूक वाटत नाही. मला या गोष्टी आवडतात. तुम्ही चालायला मला बोललात तर मला ते आवडतं. पण तुम्ही बाईट द्यायला विचारलंत तर माझी धाकधूक वाढते”, असं अमित ठाकरे म्हणाले.

पहिलं प्राधान्य समुद्रकिनाऱ्याला…

दरम्यान, निवडणूक जिंकल्यास माहीम-दादरकरांसाठी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याला पहिलं प्राधान्य असेल, असं अमित ठाकरे म्हणाले. “मी माहीम-दादरकरांसाठी समुद्रकिनारा हे पहिलं प्राधान्य मानतो. आपलं नशीब आहे की आपण इथे जन्मलो. तुम्ही इथले रस्ते बघा. शिवाजी पार्क बघा. लाल मातीचा विषय प्रलंबित आहे. तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं होतं. पण तो प्रकल्प रद्द केला. लाल मातीचा प्रकल्प आणला. तेही व्यवस्थित झालं नाही. मला क्रिकेटर्स सांगतात की हे खेळण्यासाठी सगळ्यात वाईट पिच आहे तेव्हा मला वाईट वाटतं. यावर काम व्हायला हवं असं मला वाटतं”, असंही अमित ठाकरे म्हणाले.