मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहात १८ वर्षीय तरुणीची हत्या करून एकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उजेडात आली. मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीदेवी फुले महिला वसतिगृहातील ही घटना असून, तेथील सुरक्षा रक्षकाने चर्नी रोड स्थानकाजवळ गाडीखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. तरुणीवर बलात्कार झाल्याचा संशय असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर शहराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनविसेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमित ठाकरे यांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयात एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागणं ही एक अत्यंत संतापजनक घटना आहे. ज्या सावित्रीमाईंमुळे भारतातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ झाली, त्यांच्याच नावाच्या हॉस्टेलमध्ये एका १८ वर्षीय विद्यार्थिनीचा बलात्कार आणिखून झाल्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे.
अमित ठाकरे यांनी लिहिलं आहे की, आज हजारो तरुणी आपल्या शहर आणि गावापासून दूर मुंबई-पुण्यासारख्या शहरात शिक्षण अथवा नोकरीसाठी वसतिगृहात राहत आहेत. कालच्या दुर्दैवी घटनेमुळे अशा तरुणींच्या आईवडिलांची काय घुसमट होत असेल, याची कल्पना करवत नाही. राज्य सरकार आणि संबंधित विभागांनी आता तरी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अतिगांभीर्याने घ्यावा आणि राज्यातील सर्व महिला हॉस्टेल्सचे ‘सिक्युरिटी ऑडिट’ करावे.”
घटना काय?
मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीदेवी फुले महिला छात्रालय येथील चौथ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा बंद असून तेथे राहणारी मुलगी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मिळाली होती. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पोलिसांनी खोलीत प्रवेश केला असता तरुणीचा मृतदेह सापडला, खोलीत मृतदेह जमिनीवर पडलेला होता. तसेच मृतदेह विवस्त्र असून गळ्याभोवती ओढणी गुंडाळलेली होती. मृतदेह सापडला त्या खोलीचे दार बाहेरून बंद होते. त्यामुळे अतिप्रसंग करून विद्यार्थिनीची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला आहे. तेथे शवविच्छेदनानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता का, ते स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.