महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि नेते अमित ठाकरे हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या दौऱ्याला साताऱ्यातून सुरुवात केली आहे. त्यात अमित ठाकरेंनी राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे. यावेळी माझ्या मित्राचा मुलगा घरी आला. माझा मुलगा घरी आला असं वाटलं, असे उदयनराजेंनी सांगितलं आहे.
साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस्थळाला अमित ठाकरेंनी भेट दिली. त्यानंतर शिवतिर्थावर नतमस्तक होऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. “ही राजकीय भेट नव्हती. उदयनराजे आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांनी मुलगा आल्यासारखं वाटलं म्हणाल्याने खूप बरं वाटलं,” असं अमित ठाकरेंनी म्हटलं.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले की, “अमित सारख्या तरुण नेत्यांनी पुढं आलं पाहिजे. लोकांची त्यांच्यामाध्यमातून सेवा झाली पाहिजे. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंचं नाव अमित ठाकरेंनी लौकिक केलं पाहिजे. अमितचे फॅन फॉलोविंग जोरात आहे. अमित येणार म्हटल्यावर केसांना क्लब करायचा होता. पण, ते राहिलं,” अशी मिश्किल टिप्पणी उदयराजेंनी केली आहे.
तसेच, उदयनराजेंनी अमित ठाकरेंना एक खास भेटवस्तू दिली आहे. त्याबद्दल बोलताना उदयनराजेंनी म्हटलं, “अमितला Bvlgari men हा परफ्युम भेट दिला आहे. कारण, ते लहान मुलगा राहिले नाहीत. ते आता मोठ्या माणसासारखं वागणार असून, आमच्या सर्वांची काळजी घेणार आहेत. म्हणून हा परफ्युम दिला आहे,” असं उदयनराजे भोसलेंनी म्हणताच अमित ठाकरे लाजले.