गेल्या चार दिवसांपासून मनसे नेते अमित ठाकरे यांची जोरदार चर्चा सुरू आहे. अमित ठाकरे हे शनिवारी (२३ जुलै) उत्तर महाराष्ट्र दौरा आटपून मुंबईला परत येत होते. त्यावेळी नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांची कार अडवण्यात आली होती. तिथे टोल कर्मचाऱ्यांनी अमित ठाकरे यांच्याशी वाद घातल्याचं सांगत मनसेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली होती. टोलनाक्याची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, टोलनाक्याची तोडफोड केल्यामुळे ज्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्याब्यात घेतलं होतं. त्यांना आता जामीन मिळाला आहे. कार्यकर्त्यांना जामीन मिळाल्यावर अमित ठाकरे स्वतः त्या कार्यकर्त्यांची भेट घ्यायला नाशिकला गेले होते. यावेळी अमित ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं. यावेळी अमित ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलत असताना म्हणाले, मी केवळ या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करायला इथे आलो आहे.
अमित ठाकरे म्हणाले, या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी अंगावर केसेस (खटले) घेतल्या आहेत. ही सोपी गोष्ट नाही. मी त्यांचं अभिनंदन करायला इथे आलो आहे. प्रत्येकाने टोल फोडावा असं माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की, हे सगळं प्रेमापोटी घडलंय. तुम्ही मागचा-पुढचा कुठलाही विचार करत नाही. त्यामुळे मला वाटलं मी इथे येऊन या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे.
हे ही वाचा >> “अमित महाराष्ट्रभर टोलनाके…”, तोडफोडीच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
अमित ठाकरे म्हणाले, पहिल्यांदा कोणीतरी माझ्यासाठी अंगावर केसेस घेतल्या आहेत. त्यामुळे मला वाटलं की, त्यांना मुंबईला बोलावण्यापेक्षा आपणच त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटायला हवं. म्हणून मी इथे आलो आणि या महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन केलं.