गतवर्षी एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह शिवसेनेत बंड केलं होतं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली होती. अशातच २ जुलैला अजित पवारांसह ९ आमदारांनी राष्ट्रवादीत बंड करत शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावेत अशी चर्चा सुरु आहे. यावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
“दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत बसणं गरजेचं आहे,” अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ‘एक सही संतापाची’ या मोहिमेचं दहिसर येथे आयोजन केलं होते. तेव्हा अमित ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा : “सुप्रिया सुळेंसाठी अजित पवारांकडे दुर्लक्ष”, प्रफुल पटेलांच्या आरोपांवर शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
अमित ठाकरे म्हणाले, “मला वाटतं, दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत बसणं गरजेचं आहे. ते म्हणजे राज ठाकरे… आम्ही या राजकीय चिखलात नाही. त्यामुळे मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. राज ठाकरेंनी आम्हाला येथेपर्यंत पोहचवलं आहे. यापुढील निर्णयही राज ठाकरेच घेतील.”
हेही वाचा : मुंबईत पराभव झाल्यानंतर येवल्यातून निवडून आणलं, भुजबळांनी जाण ठेवली नाही? शरद पवार स्पष्ट करत म्हणाले…
“अनेक दगडांवर पाय ठेवून कुणालाही राजकारण करता येणार नाही”
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. “सतत वर्षे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? हा प्रश्न विचारला जात आहे. ज्या प्रकारची हुकूमशाही, दडपशाही सुरु आहे. पैशांचं राजकारण सुरु आहे. ही महाराष्ट्राची ओळख पुसायची असेल, तर या प्रवृत्ती विरुद्ध ज्यांची मनापासून आणि प्रामाणिकपणे लढण्याची इच्छा आहे. त्या सर्व घटकांनी एकत्र यावं, या मताचा मी आहे. अनेक दगडांवर पाय ठेवून आता कुणालाही महाराष्ट्राचं राजकारण करता येणार नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.