पंढरपूर : विधानसभा निवडणुकीत आपल्यासाठी वरळी विधानसभा मतदारसंघ ठरलेला नाही. मात्र पक्षाला गरज असेल तिथं महाराष्ट्रातील कुठल्याही मतदारसंघातून आपण निवडणूक लढण्यास तयार आहे. अशी माहिती मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिली आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे अशी लढत होण्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बोलत होते. मनसेने राज्यातील आपला पहिला उमेदवार म्हणून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानुसार धोत्रे यांनी मतदारसंघात विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम, भेटीगाठी घेणे सुरू केले. या माध्यमातून धोत्रे यांनी राज्यातील पहिल्या मनसे केसरी कुस्ती स्पर्धेचे मंगळवेढा येथे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी ठाकरे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा >>>Akshay Shinde Encounter : “पोलिसांची बंदूक साधारणपणे लॉक असते, ती…” ; अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर असीम सरोदेंचा प्रश्न
ठाकरे म्हणाले, की वरळी विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढण्याचे अद्याप ठरलेले नाही. मी कोठूनही आणि कुणाही विरुद्ध निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यास तयार आहे. दरम्यान राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध आरक्षण आंदोलनाबाबत ठाकरे यांनी विचारले असता ते म्हणाले, की आरक्षण हे आर्थिक निकषावर द्यावे, जात न बघता जो गरीब आहे त्याना आरक्षण द्या, अशी भूमिका त्यांनी मांडली. माझ्या मते येथे म्हणजे महाराष्ट्रात राहण्याचे जे समाधान पाहिजे ते गेले आहे. जनतेच्या चेहऱ्यावर हास्य नाही.
मनसे केसरीचा मानकरी गायकवाड
दिलीप धोत्रे यांनी मंगळवेढा येथे मनसे केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. महेंद्र गायकवाड विरुद्ध आशिष हुड्डा यांच्यात पहिल्या मनसे केसरीसाठीची लढत झाली. नऊ मिनिटांच्या खेळानंतर महेंद्र गायकवाड याने हरियाणाच्या आशिष हुड्डा याला आसमान दाखवत राज्यातील पहिल्या मनसे केसरीचा किताब पटकावला. यानंतर अमित ठाकरे आणि दिलीप धोत्रे यांच्या हस्ते महेंद्र गायकवाड याला मानाची चांदीची गदा, रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. मंगळवेढ्यात भव्यदिव्य अशा मनसे केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन झाले होते.