Amit Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्ता मेळावा घेतला होता. या मेळाव्यात बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ४२ आमदार कसे निवडून आले? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. यावर पलटवार करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना स्वतःचा मुलगाही निवडून आणता आला नाही, असा टोला लगावला होता. या टोल्यानंतर आता अमित ठाकरे यांनी स्वतः यावर प्रत्युत्तर दिले आहे. तसेच अजित पवारांना राज ठाकरेही उत्तर देतील, असेही ते म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ खासदार निवडून आले होते. त्यानंतर दोनच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत इतकी तफावत कशी? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. “अजित पवारांचे ४२ आमदार निवडून आले? त्यांचे चार पाच आमदार तरी येतील का? असे सगळ्यांना वाटत होते. कुणाचा तरी विश्वास बसेल का? जे इतके दिवस राज्यात राजकारण करत आले आहेत, ज्यांच्या जिवावर भुजबळ, अजित पवार मोठे झाले त्या शरद पवारांना फक्त १० जागा? न समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे”, अशी टीका राज ठाकरेंनी मेळाव्यातून केली होती.
अजित पवार काय म्हणाले?
राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, “राज ठाकरे यांनी त्यांना जे काय वाटते, ते म्हटले. त्याच्याशी आम्हाला काही घेणे-देणे नाही. जनतेने आम्हाला निवडून दिले. लोकसभा निवडणुकीत जेव्हा महायुतीच्या १७ जागा निवडून आल्या, तेव्हा आम्ही रडत बसलो नाही. तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि आम्हाला सांगता. यावेळेस आम्ही कष्ट घेतले होते, मेहनत केली होती. म्हणून आमचे आमदार निवडून आले. मलाही मागे माझ्या मुलाला निवडून आणता आले नव्हते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून आणता आले नाही. तो कौल लोकांनी दिला होता, ईव्हीएममध्ये गडबड झाली, असे आम्ही म्हणालो नाही. जनतेने मतदान केले, लोकशाहीत आपण ते मान्य केले पाहीजे.”
अमित ठाकरेंचे प्रत्युत्तर
अजित पवारांच्या टीकेबद्दल अमित ठाकरे यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, “अजित पवारांवर बोलण्यासाठी मी खूप लहान आहे. यावर राज ठाकरेच उत्तर देऊ शकतील. पण मी पराभूत झालो असलो तरी खचलो नाही. या निवडणुकीतून मी खूप शिकलो. त्यामुळे मला फरक पडत नाही. मी एवढेच सांगेन की, माझ्या पहिल्या निवडणुकीवरून तर शेवटच्या निवडणुकीवरून माझे मूल्यमापन करा.”