महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ‘ब’ आणि गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टेलिग्राम लिंकद्वारे ८० ते ९० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रमाणपत्रं लीक झाल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय ही लिंक व्हायरल करणाऱ्यांकडे ३० एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिकाही उपलब्ध असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मनसेच्या विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी याबाबत फेसबूकवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, गेल्या काही वर्षांत एमपीएससीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रांवर गोंधळ, निकाल दिरंगाई अशा बातम्यांची महाराष्ट्राला सवय झाली; पण आजचं एमपीएससी डेटा लीक (MPSC Data Leak) प्रकरण धक्कादायक आहे. अवघ्या सात दिवसांवर आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं, आयोगाकडे असलेली विद्यार्थ्यांची सर्व माहिती तसेच प्रश्नपत्रिका आपल्याकडे असल्याचा दावा कुणी समाजमाध्यमांवर करत असेल तर हे खूपच गंभीर प्रकरण आहे. उच्चस्तरीय समिती नेमून या प्रकरणाची तत्काळ चौकशी व्हायला हवी. तसेच, आयोगाने नवीन प्रश्नपत्रिका काढून ही परीक्षा घ्यायला हवी.
ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ‘डेटा खूप मौल्यवान आहे’ हे ओळखून यापुढे एमपीएससीची वेबसाईट हॅकर्सकडून हॅक होणार नाही किंवा डेटा लीक होणार नाही, यासाठी आयोगाने एथिकल हॅकर्स आणि आयटी-डेटा एक्सपर्ट्सच्या सहकार्याने सर्वतोपरी तांत्रिक दक्षता घ्यायला हवी आणि आपली विश्वासार्हता जपायला हवी. अन्यथा, विद्यार्थ्यांना वारंवार धक्के देणाऱ्या गलथान कारभारामुळे या आयोगाची ‘महाराष्ट्र पब्लिक शॉकिंग कमिशन’ हीच ओळख सर्वांच्या मनात कायम होईल.
हे ही वाचा >> “…त्यावेळी राऊत एकनाथ शिंदेंच्या पाया पडलेले”, संजय शिरसाटांचं वक्तव्य, म्हणाले, “जुगाडामुळे…”
नेमकं प्रकरण काय?
येत्या ३० एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ‘ब’ आणि गट ‘क’ ही संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. परंतु, त्यापूर्वीच एका टेलिग्राम चॅनलवरील लिंकद्वारे ८० ते ९० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रमाण पत्रांचा डेटा लीक झाला आहे. दरम्यान, “हा केवळ नमुना डेटा आहे. आमच्याकडे सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पोर्टल लॉग इन आयडी, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, ई-मेल आयडी, अशी बरीच माहिती उपलब्ध आहे. शिवाय संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिकाही आमच्याकडे उपलब्ध आहे”, असा दावा या लिंकद्वारे करण्यात आला आहे.