योगेश कदम यांना सावधानतेची ‘घंटा’

दापोलीतील शिवसेनेवर वर्चस्व सिद्ध करण्याच्या स्पध्रेत आता ज्येष्ठ शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर यांनीही उडी घेतली आहे. माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या साथीने दापोलीत राज्यस्तरिय युवा महोत्सवाचे आयोजन करून त्यांनी याच मोहिमेचे बिगूल वाजवले असून पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांच्यासाठी ही सावधानतेची घंटा ठरणार आहे.

माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या पराभवानंतर अमोल किर्तीकर यांनी युवासेनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये नवचतन्य निर्माण केले. त्यासाठी त्यांनी शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले.

दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला त्याचाच फायदा झाल्याची पोचपावतीही दळवी यांनी जाहीरपणे दिली आहे. तालुक्यातील शिर्दे गावात किर्तीकर यांचे घर आणि जमीन असून अमोल किर्तीकर यांचे शिक्षण दापोलीत झालेले आहे. त्यामुळे येथील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे. मात्र गजानन किर्तीकर यांनी आसूदमध्ये आदर्श गाव योजनेसाठी केलेले काम वगळता तालुक्यात अन्यत्र विकास कामांच्या माध्यमातून प्रभाव टाकणे टाळले. त्यामुळे अमोल किर्तीकर यांच्याकडे पाहण्याचा शिवसेना कार्यकर्त्यांचा दृष्टीकोन आतापर्यंत वेगळा राहिला.

या घडामोडी होत असताना योगेश कदम यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जाहीरपणे संपर्क मोहिमेस सुरूवात केल्याने दळवी विरूद्ध कदम असा वाद उफाळून आला.

त्यातच नाराज दळवी शिवसेनेतून बाहेर पडणार, अशा चर्चा व्हायला लागल्या. या गदारोळात अमोल किर्तीकर यांच्या नावाची चर्चा मागे पडली होती. या पाश्र्वभूमीवर सूर्यकांत दळवी यांच्या साथीने शिवधनुष्य राज्यस्तरीय युवा महोत्सवाची घोषणा करत अमोल किर्तीकर यांनी स्वतची भूमिका आता स्पष्ट केली आहे. यामुळे दळवी यांचे पारडे जड झाले आहेच, पण अमोल किर्तीकर यांनाही दळवी समर्थकांचे पाठबळ मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

२१ ते २३ जानेवारीदरम्यान होणाऱ्या या शिवधनुष्य महोत्सवात पहिल्या दिवशी कै. मोहन गवळी करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा होणार आहे.

दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी अनुक्रमे राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा आणि व्यक्तिमत्व व सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. युवासेना तालुका अधिकारी ऋषिकेश गुजर, विक्रांत गवळी, वीरेंद्र िलगावळे, रूपेश सावंत, मनोज कदम यांच्याशी ९२७३ १४५३९३ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader