शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा काढला आहे. या मोर्चाला शिवनेरी येथून बुधवारी ( २७ डिसेंबर ) सुरूवात झाली. यावेळी अमोल कोल्हेंनी राज्य सरकारवर टीकास्र सोडलं आहे. “शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे ठाम भूमिका मांडतंय की फक्त दिल्लीसमोर माना खाली घालून उभे राहणार?” असा सवाल अमोल कोल्हेंनी उपस्थित केला. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
अजित पवारांच्या आव्हानाचं दडपण मोर्चावर आहे का? या प्रश्नावर अमोल कोल्हे म्हणाले, “सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी दडपण कसलं? अजित पवार मोठे नेते आहेत. त्यांच्यावर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यानं प्रतिक्रिया देणं उचित ठरणार नाही. अजित पवार सरकार महत्वाचे घटक आहे. तेवढीच धडाडीची पावले अजित पवारांकडून पडावी हे शेतकऱ्यांसह आमचीही अपेक्षा आहे.”
“शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे ठाम भूमिका मांडतंय की फक्त दिल्लीसमोर माना खाली घालून उभे राहणार? गेले तीन आठवडे कांद्यावर निर्यात बंदी लागू करण्यात आली आहे. सरकारमधील प्रतिनिधीकडून केवळ मंत्र्यांबरोबर फोटो काढण्यापलीकडे कुठलीही कार्यवाही झाल्याचं दिसत नाही,” अशी टीका अमोल कोल्हेंनी केली होती.
हेही वाचा : शिरूरमधून उमेदवार निवडून आणण्याचा अजित पवारांचा निर्धार, जितेंद्र आव्हाड म्हणाले, “दमदाटीकरणं हाच…”
अजित पवार काय म्हणाले होते?
“एका खासदारानं मतदारसंघात पाच वर्षे लक्ष दिलं असतं, तर खूप चांगलं झालं असतं. त्या खासदाराला उमेदवारी देण्याचं काम मी केलं. तसेच, निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी जिवाचं रान केलं आहे. मधील काळात सहाही विधानसभा मतदारसंघात ते फिरत नव्हते. पूर्णपणे दुर्लक्ष केलं. ‘मी एक कलावंत आहे, माझ्या चित्रपटांवर परिणाम होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेला चित्रपट चालला नाही. याचा आर्थिक गोष्टीवर परिणाम होतोय,’ असं वरिष्ठांना आणि मला सांगत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती. मी हे बोलणार नव्हतो. पण, निवडणुका आल्यानं यांना उत्साह आला आहे. त्यामुळे कुणाला संघर्ष तर कुणाला पदयात्रा सूचत आहे,” असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर टीका केली होती.
हेही वाचा : लोकसभेसाठी अजित पवार गट महायुतीत किती जागा मागणार? यादी वाचत अमोल मिटकरी म्हणाले, “शिरूर, रायगड…”
“जनाधार पाहून उमेदवारी देतो”
“२०१९ साली शिरूरमध्ये योग्य पद्धतीनं उमेदवारी दिली होती. आम्ही जनाधार पाहून उमेदवारी देतो. निवडून आल्यानंतर कसं काम करायचं, हा ज्याचा त्याचा अधिकार असतो. मात्र, आता शिरूरमध्ये दिलेला उमेदवार निवडून आणणारच,” असा निर्धार व्यक्त करत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना आव्हान दिलं होतं.