उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निशाण्यावर आता शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे आले आहेत. अजित पवार यांनी “शिरूरमध्ये उमेदवार निवडून आणणारच,” असा निर्धार व्यक्त करत अमोल कोल्हेंना आव्हान दिलं आहे. यावर अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे. तर, “१०० टक्के मी निवडणूक लढवणार. शरद पवार घेतील तो निर्णय मला मान्य असेल,” असं अमोल कोल्हेंनी ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना म्हटलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“एका खासदारानं मतदारसंघात पाच वर्षे लक्ष दिलं असतं, तर खूप चांगलं झालं असतं. त्या खासदाराला उमेदवारी देण्याचं काम मी केलं. तसेच, निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी जिवाचं रान केलं आहे. मधील काळात सहाही विधानसभा मतदारसंघात ते फिरत नव्हते. पूर्णपणे दुर्लक्ष केलं. ‘मी एक कलावंत आहे, माझ्या चित्रपटांवर परिणाम होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेला चित्रपट चालला नाही. याचा आर्थिक गोष्टीवर परिणाम होतोय,’ असं वरिष्ठांना आणि मला सांगत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती. मी हे बोलणार नव्हतो. पण, निवडणुका आल्यानं यांना उत्साह आला आहे. त्यामुळे कुणाला संघर्ष तर कुणाला पदयात्रा सूचत आहे,” असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना लक्ष्य केलं.
“जनाधार पाहून उमेदवारी देतो”
शिरूरमध्ये उमेदवारी देण्यास चुकला का? असा प्रश्न प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं विचारल्यावर अजित पवार म्हणाले, “तेव्हा योग्य पद्धतीनं उमेदवारी दिली होती. आम्ही जनाधार पाहून उमेदवारी देतो. निवडून आल्यानंतर कसं काम करायचं, हा ज्याचा त्याचा अधिकार असतो. मात्र, आता शिरूरमध्ये दिलेला उमेदवार निवडून आणणारच.”
“शिरूर मतदारसंघातील कामांचं अजित पवारांनी कौतुक केलं”
अजित पवारांच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंनी म्हटलं, “अजित पवार हे मोठे नेते आहेत. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला ते आव्हान देतील, असं वाटत नाही. कारण, शिरूर मतदारसंघातील कामांचं अजित पवारांनी कौतुक केलं आहे.”
हेही वाचा : शिरूर लोकसभा : अजित पवारांच्या शिरूर लोकसभेच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर विलास लांडे अॅक्टिव्ह!
“अजित पवारांनी पदयात्रेला पाठिंबा दिला पाहिजे”
“पदयात्रा सूचण्याचा विषय नाही. कांद्याच्या निर्यातीबाबत शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न पदयात्रेतून मांडणार आहोत. अजित पवारांनी पदयात्रेला पाठिंबा दिला पाहिजे. कांद्याची निर्यातबंदी उठवण्यासाठी अजित पवारांनी आमच्या सुरात सूर मिसळला पाहिजे,” असं आवाहन अमोल कोल्हेंनी केलं आहे.
“निवडणूक लढवण्याबाबत शरद पवार निर्णय घेतील”
अजित पवारांनी शिरूरमधून लोकसभेचा उमेदवार उभा केला, तर त्याविरोधात निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर अमोल कोल्हे म्हणाले, “मी शिरूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे. शिरूरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे. निवडणूक एकमेकांना आव्हान देण्याची गोष्ट नाही तर प्रतिनिधित्व आणि प्रश्न मांडण्याची गोष्ट आहे. मी १०० टक्के निवडणूक लढवणार आहे. याचा निर्णय शरद पवार घेतील.”