भाजपा आमदार नितेश राणेंनी एकेरी उल्लेख करत खासदार अमोल कोल्हेंवर टीका केली होती. तो कुठलातरी अमोल कोल्हे पैसे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो. त्याला मालिकांसाठी पैसे दिले जातात. तो फक्त नावासाठी निवडून आलेला आहे. त्याला २०२४ साली पराभूत करून टाकू. तो फक्त मालिकांपुरताच आहे, असं नितेश राणेंनी म्हटलं होतं. याला नितेश राणेंना अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, “ते शिरुर लोकसभेची निवडणूक लढणार आहेत का? मला याची कल्पना नाही. निवडणुकीत कोण जिंकणार, कोण लढणार हे ४०० किलोमीटवर असलेला व्यक्ती ठरवत नाही. तर, त्या मतदारसंघातील ज्येष्ठ, तरुण, माता-भगिनी ठरवतात. त्यामुळे आमदारांनी मतदारांना गृहित धरण्याचं काम करु नये.”
हेही वाचा : अमित देशमुख भाजपात प्रवेश करणार? संभाजी पाटील निलंगेकरांचं मोठं विधान; म्हणाले…
“वडिलांच्या कष्टावर आणि कर्तृत्वावर स्वत:च्या अस्तित्वाची पोळी भाजणाऱ्यांबद्दल कशाला बोलावं. स्वत:च कर्तृत्व आणि वैचारिक उंची, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहचवण्यासाठी ज्यांचं योगदान आहे, अशा लोकांवर बोलण्यास जास्त उचित वाटतं,” असा टोला अमोल कोल्हेंनी राणेंना लगावला.
हेही वाचा : “राहुल गांधींची दाढी काढा अन्…”, RSSचा उल्लेख करत नितेश राणेंचं टीकास्त्र
“कलाक्षेत्र हे माझ्या उदर्निवाहाचं साधन आहे. माझ्या उत्पन्नाचे स्त्रोत उजळ माथ्याने सांगू आणि मांडू शकतो. ते सुद्धा त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत उजळ माथ्याने समाजात मांडू शकतात का? तसं असेल तर त्यावर बोलू,” असं आव्हान अमोल कोल्हेंनी नितेश राणेंना दिलं आहे.