Amol Kolhe : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना चांगलेच टोले लगावले आहेत. एक कविता सादर करुन त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. जुलै २०२३ मध्ये अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यानंतर अजित पवार हे महायुतीत आले आणि उपमुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष सुरु झाला. अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाचा दाखला देत त्यांनी आता आम्हाला सल्ला द्यावा, आशीर्वाद द्यावा असं म्हटलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी भाकरी फिरवली. शरद पवारांच्या पक्षाचे ९ खासदार निवडून आले. आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. अशात खासदार अमोल कोल्हेंनी ( Amol Kolhe ) केलेली ही कविता चांगलीच चर्चेत आली आहे.
अमोल कोल्हे काय म्हणाले? (What Amol Kolhe Said? )
अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांनी बारामतीतल्या शिवस्वराज्य यात्रेत खणखणीत भाषण केलं. त्यावेळी ते म्हणाले, “बारामतीकरांनी लोकसभा निवडणुकीत दाखवून दिलं आहे. आता वेळ आली आहे, त्यांची जागा दाखवून द्यायची. शरद पवारांच्या नेतृत्वात राज्य नाही तर देशाचं सरकारही बदलायचं आहे. त्यामुळे लोकसभेसारखं कामाला लागा” अशा सूचना त्यांनी उपस्थितांना दिल्या.
लाडकी बहीण योजनेवरही टीका
सध्याच्या लाडकी बहीण योजनेवरही अमोल कोल्हेंनी ( Amol Kolhe ) टीका केली. काही योजनांचा पोहा पोहा सुरु आहे. या योजनांची फोड बारामतीकरांसारखी कुणी करु शकत नाही. नऊ वर्षे भाऊ दारावरुन कधी जातो कधीच कळत नाही आणि अचानक भाऊ दारात येऊन रक्षाबंधन करतो. भावाने आणि बहिणीने काय करावं? इतकी वर्षे आठवण आली नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी बहीण लाडकी नव्हती. निवडणुकीनंतर जर ही परिस्थिती येत असेल तर काय डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले जातात हे तुम्हीच बघा. असं अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) म्हणाले.
लाडक्या खुर्चीसाठी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीची आठवण- अमोल कोल्हे
वाघाच्या आवाजाचं म्याव झालं
काहीजण म्हणतात, विकासासाठी लोक जातात. हे आपण अनेकदा ऐकतो. आम्हाला एक दरारा असलेला आवाज ऐकायची सवय झाली होती. वाघाच्या आवाजाचं म्याव झालं की काय कळेना असं म्हणत अमोल कोल्हेंनी ( Amol Kolhe ) अजित पवारांना टोला लगावला तसंच एक कविता सादर करत तुफान टोलेबाजी केली.
अमोल कोल्हेंची कविता काय?
किती दमदाटी केली तरी लोक आता बघत नाही,
बघतो तुला, बघून घेतो हे स्वाभिमानाला आमच्या खपत नाही.
वस्तू चोरली, रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही.
स्वार्थासाठी बाप बदलला तरी जनतेला ते पटत नाही.
घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे.
जॅकेट घाला, योजना काढा, हवा फक्त पवारसाहेबांची आहे