Amol Mitkari Asks Naresh Arora Admit Your mistake : अजित पवार यांनी व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं आहे. या यशानंतर अनेकांनी अजित पवारांचं अभिनंदन केलं. अजित पवारांचे माध्यम सल्लागार नरेश अरोरा यांनी देखील अजित पवारांचं अभिनंद केलं. यावेळी अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढला. हा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरांवर संताप व्यक्त केला आहे. “”अरोराची अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवायची हिंमत कशी झाली?” अशा शब्दांत मिटकरींनी जाब विचारला आहे.
दरम्यान, मिटकरी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की “विधानसभा निवडणुकीतील विजय हे अजित पवारांच्या मेहनतीचं फळ आहे. गुलाबी रंगाची कोणतीही जादू नव्हती. दादांच्या खांद्यावर हात पाहून मनाला वेदना झाल्या. माझ्यासारख्या बहुआयामी व्यक्तीमत्वाच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या दादांचा सैनिक हे माफ करणार नाही”. मात्र काही वेळाने मिटकरी यांनी ही पोस्ट एक्सवरून डिलीट केली.
हे ही वाचा >> आज-उद्या शपथविधी होणार नाही! राष्ट्रवादीने सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी; मुख्यमंत्रिपदाबाबत म्हणाले..
पक्षाने मिटकरींनाच सुनावलं
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या गोष्टीची दखल घेत मिटकरींचं ते मत वैयक्तिक आहे असं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “अमोल मिटकरी यांचं ‘डिझाईनबॉक्स्ड’संदर्भातील (नरेश अरोराची कंपनी) वक्तव्य ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कुठलाही संबंध नाही. डिझाईनबॉक्स्ड टीमने विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी अतिशय मोलाची भूमिका बजावली आहे आणि पुढेही बजावत राहील यात शंका नाही”.
हे ही वाचा >> भाजपासमोर शिंदेंची माघार? मुख्यमंत्रिपदाबाबत केसरकरांनी मांडली शिवसेनेची भूमिका; म्हणाले, “शिंदेंनी राजीनामा देणं म्हणजे…”
मिटकरी पक्षाशी भिडले
पक्षाने अशा प्रकारे अमोल मिटकरींना एकटं पाडल्यानंतर मिटकरी यांनी एक्सवर आणखी एक पोस्ट करून पक्षालाच सुनावलं आहे. मिटकरी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “हे पण तुम्ही आम्हाला सांगणार का? मी जे वक्तव्य डिझाईन बॉक्स संदर्भात केलं ते वक्तव्य म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रत्येकाचीच भावना आहे.आमचा साधा प्रश्न आहे,अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी केली? हा महाराष्ट्र आहे, चंदिगड नाही.चूक कबूल करा. सॅलरी सोल्जर”.