अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहेत. अशातच अजित पवारांच्या गटातील आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले, “अजित पवार यांच्या गटातील अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत. परंतु, मी त्याच्या खोलात जाणार नाही. कारण त्यांची अडचण होऊ नये असं मला वाटतं. त्यांची काही कामं आहेत जी झाली पाहिजेत. मी त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करणार नाही. योग्य वेळी आली की आपण पाहू. तसेच ही मंडळी परत आली तर त्यांना पक्षात परत घ्यायचं की नाही याबाबतचा निर्णय शरद पवार घेतील. अंतिम निर्णय त्यांचाच असेल. मात्र अजित पवार गटातल्या आमदारांची परत येण्याची इच्छा आहे.
जयंत पाटील यांच्या या दाव्यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं आहे. अमोल मिटकरी यांनी काही वेळापूर्वी मुंबई तक या वृत्तवाहिनीशी बातचीत केली. यावेळी मिटकरी म्हणाले, जयंत पाटील हे मोठे नेते आहेत. परंतु, त्यांचा दावा कितपत खरा आहे हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल. आज १९ ऑक्टोबर ही तारीख आहे. येत्या २५-२६ ऑक्टोबरपर्यंत जयंत पाटलांचं वक्तव्य किती खरं आहे ते स्पष्ट होईल. आमचे १५ आमदार त्यांच्या संपर्कात आहेत की त्यांचाच मोठा नेता आमच्या संपर्कात आहे याचं खरं चित्र लवकरच महाराष्ट्रासमोर येईल.
दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धर्माराव आत्राम यांनी दावा केला आहे की जयंत पाटीलच आमच्या संपर्कात आहेत. मंत्री आत्राम म्हणाले, आमच्याबरोबर एकूण ४५ आमदार आहेत. सध्या कोणीही शरद पवारांच्या संपर्कात नाही. उलट त्यांच्याकडचे काही आमदार आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून सध्या त्यांची बोलणी सुरू आहे. जयंत पाटील यांच्यासह आठ अमदार अजित पवार गटात येतील.
दरम्यान, धर्माराव आत्राम यांच्या दाव्यावर अमोल मिटकरी म्हणाले, आत्राम हे आमच्या पक्षातील वरिष्ठ नेते आहेत. ते जर असं काही म्हणाले असतील, तर त्यांच्या बोलण्यात तथ्य असू शकतं. येत्या पाच ते सात दिवसांत महाराष्ट्रासमोरचा संभ्रम दूर होईल. कोणाचे किती आमदार कोणाच्या संपर्कात आहेत त्याबाबतचा संभ्रम राहणार नाही.
हे ही वाचा >> “माफी मागा अन्यथा राज्यात उद्या सकाळी आंदोलन”, बावनकुळे असे का म्हणाले…
आमदार अमोल मिटकरी म्हणाले, शरद पवार यांनी गुरुवारी (१८ ऑक्टोबर) लोकसभा निवडणुकीसाठी आढावा बैठक घेतली. या बैठकीला केवळ मानसिंह नाईक हे एकमेव आमदार उपस्थित होते. एकटे मानसिंह नाईक बैठकीला गेले असतील आणि त्यावरून जयंत पाटील यांनी १५ आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा कयास लावला असेल तर तो चुकीचा आहे. त्याचबरोबर मानसिंह नाईक हे मुळातच सुरुवातीपासून शरद पवारांच्या गटात आहेत. मी पूर्ण विश्वासाने सांगतोय, येत्या पाच ते सात दिवसांत महाराष्ट्रासमोर दूध का दूथ आणि पाणी का पाणी’ होईल.