Amol Mitkari On Ajit Pawar Birthday : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (२२ जुलै) त्यांचा ६४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसामुळे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. अजित पवारांच्या वाढदिवसानमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी होर्डिंग्स लावले आहेत. त्यातल्या काही होर्डिंग्सवर अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या होर्डिंग्सवरून राजकीय चर्चा सुरू असतानाच आता अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच आमदार अमोल मिटकरी यांच्या ट्वीटने चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवार यांच्या वाढदिवसानमित्त आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटच्या कॅप्शनमध्ये आमदार मिटकरी यांनी लिहिलं आहे की, “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व…”
या ट्वीटमध्ये जोडलेल्या व्हिडीओमध्ये अजित पवार यांनी याआधी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचा काही भाग, अजित पवारांच्या मुलाखती आणि भाषणांमधील रोखठोक वक्तव्ये पाहायला मिळत आहेत.
अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि राज्यात लवकरच अजितपर्व सुरू होईल, असा दावा अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्वीटमधून केल्याचं दिसत आहे. दरम्यान, काल (शुक्रवार, २१ जुलै) शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही अशाच प्रकारचं सूचक वक्तव्य केलं होतं.
खासदार संजय राऊत शुक्रवारी पत्रकार परिषदेत म्हणाले, अजित पवार भावी मुख्यमंत्री आहेत म्हणजे ते फार दिवस भावी राहणार नाहीत. मलाही राजकारण माहिती आहे. कुठे काय घडामोडी घडत आहेत ते मलाही माहिती आहे. मग त्या घडामोडी कायदेशीर असतील, घटनात्मक असतील किंवा राजकीय असतील. परंतु अजित पवार हे भविष्यातले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं हे भविष्य लवकर-लवकर जवळ येत आहे. त्यामुळे अजित पवार हे मुख्यमंत्री होतील यात शंका नाही. मी याआधीही सांगितलं आहे की, महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल.
हे ही वाचा >> “अतुलदादा, तुझी बहीण, आई किंवा बायको असती तर…”, यशोमती ठाकूर भाजपा आमदारावर संतापल्या
वाढदिवस साजरा न करण्याचं अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन
रायगडच्या खालापूरमधील इर्शाळवाडीत घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. यात आतापर्यंत १३ जण दगावले असून अद्याप अनेकजण बेपत्ता आहेत. यासह दुर्घटनेत मोठी वित्तहानीही झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली. अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना तसेच हितचिंतकांना आवाहन केलं आहे की, “कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नका. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर पैसे खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पूर्नउभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा.”