Maharashtra Monsoon Session : आज पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की झाली. या घटनेनंतर विरोधक-सत्ताधारी एकमेकांविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जो प्रकार घडला तो जनतेला आवडलेला नसेल तर मी त्यांची एक नाही दहा नाही तर हजारवेळा माफी मागतो. पण सत्तेच्या जोरावर शिवीगाळ करणाऱ्यांची मी माफी मागणार नाही, अशी प्रतिक्रिया मिटकरी यांनी दिली आहे. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> मंत्री चांगलंच उत्तर देतील अशी हमी तुम्ही कशी देता? जयंत पाटलांच्या खोचक प्रश्नावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले…

“आज जो प्रकार घडला तो महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा नाही. महाराष्ट्राच्या जनतेला हा प्रकार वाईट वाटला असेल तर मी माफी मागतो. ही माफी मी एकदा नाही, दहादा नाही तर हजार वेळा मागतो. मात्र एखाद्या आमदाराने मस्तीच्या जोरावर शिवीगाळ केली असेल, तर मी त्यांची कधीच माफी मागणार नाही. महाराष्ट्र त्यांना कधीच माफ करणार नाही,” असे अमोल मिटकरी म्हणाले.

हेही वाचा >> आमदारांना झालेल्या धक्काबुक्कीवरून अजित पवारांची शिंदे गटावर टीका; म्हणाले, “ती पन्नास खोक्यांची घोषणा…”

“पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा सत्ताधाऱ्यांच्या वर्मी लागली. त्यांच्यावरील जनतेचा असलेला संशय खोडून काढण्यासाठी हा केवीलवाणा प्रयत्न केला गेला. ५० खोके एकदम ओके घोषणेविरोधात त्यांनी राग व्यक्त केला. त्याची सुरुवात त्यांनी माझ्यासारख्या सामान्य आमदारापासून केली. राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडीचे सर्व आमदार त्यांच्या मागे उभे होते. आम्हाल त्यांना लोटायचे असते तर कधीच लोटले असते. मात्र आमच्यावर ते संस्कार नाहीत. त्यांचे लेकी बोले सुने लागे असे झाले आहे. आमच्या घोषणा त्यांना लागल्या. म्हणजेच त्यांनी ५० खोके घेतले आहेत,” असेदेखील अमोल मिटकरी म्हणाले.

हेही वाचा >> अधिकाऱ्याला नग्न महिलेचे पेपरवेट दाखवून अश्लील चाळे, भाजपा आमदाराची थेट अधिवेशनात तक्रार, म्हणाले…

विधीमंडळ पायऱ्यांवर नेमके काय घडले होते?

आजचं कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी भिडले. विरोधकांकडून ‘५० खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके!’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. दरम्यान, सत्ताधारी पक्षाचे आमदार विधीमंडळाच्या पायऱ्यांवर उपस्थित असल्याने विरोधकांनी आमची जागा हायजॅक केल्याचा आरोप केला. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमदार अक्षरश: एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं चित्र निर्माण झालं. यावेळी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात जोरदार वाद झाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari comment over assembly session clash with mahesh shinde said apologize to people prd
Show comments