अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी फ्लेक्सवर पंढरपूरच्या पांडुरंगापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मोठा दाखवण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच पिंपरी चिंचवड येथे भाजपाने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा जाणीवपूर्वक मोठा दाखवून वारकरी संप्रदायाचा अवमान केला असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी मोदींच्या तुकोबरायांच्या वेशातील फोटोवरही आक्षेप घेतला. तसेच यामागे भाजपाची आध्यात्मिक आघाडी असल्याचा आरोप केला. ते सोमवारी (१३ जून) अकोल्यात आरएनओ या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमोल मिटकरी म्हणाले, “भारतीय जनता पार्टीने आज नाटक सुरू केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो जगदगुरू संत तुकोबारायांच्या वेशात दाखवण्यात येत आहे. त्यातून तुकोबारायांचा फार मोठा अपमान केला आहे.”

“भाजपाकडून पांडुरंगाची प्रतिमा मोदींपुढे लहान करण्यात आली”

“दुसरीकडे ज्या पांडुरंगाला आमच्या संतांनी सर्वस्व मानलं त्या पांडुरंगाची प्रतिमा मोदींपुढे लहान करण्यात आली. यामागे भाजपाच्या आध्यात्मिक विकास आघाडीचा मेंदू आहे. भाजपाकडून वारंवार अशा पद्धतीने समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचं पाप होत आहे,” असं मत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं.

“मोदी पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाही”

“हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. नरेंद्र मोदी निश्चित मोठे आहेत, पण ते पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाही हा माझा वारकरी म्हणून विश्वास आहे. त्यामुळे यामागील मेंदू शोधला पाहिजे,” अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली.

हेही वाचा : “आजपासून भाजपाच्या अध:पतनाला सुरुवात”, अमोल मिटकरींचा इशारा; म्हणाले, “चंद्रकांत पाटलांच्या…!”

“वारकरी पांडुरंगाचा अपमान कधीही सहन करणार नाही”

“मी अशा कृत्याचा निषेध करतो. नरेंद्र मोदींनी, त्यांच्या पक्षातील लोकांनी महाराष्ट्राची आणि वारकरी संप्रदायाची माफी मागावी. इथला वारकरी पांडुरंगाचा अपमान कधीही सहन करणार नाही,” असा इशाराही मिटकरी यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari criticize pm narendra modi and bjp over banner of pandurang in pimpri chinchwad pbs
Show comments