Amol Mitkari : अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या. या हल्ल्यानंतर अमोल मिटकरी यांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी अद्यापही कोणावर कारवाई केली नसल्याचा आरोप आता अमोल मिटकरी यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमोल मिटकरी हे अकोला येथील पोलीस अधिक्षक कार्यालयाबाहेर आंदोलनाला बसले असून त्यांनी अकोला पोलिसांनावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोननंतर अकोला पोलीस आरोपींना पडकण्यास टाळाटाळ करत असल्याचे ते म्हणाले. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी मनसेच्या काही नेत्यावर टीकाही केली.

हेही वाचा – Amol Mitkari : मनसे कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी पोलिसांचा कट? अमोल मिटकरींचं सूचक वक्तव्य; राष्ट्रवादी मोर्चा काढणार

अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले?

“मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर पोलीस मला संरक्षण देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत माझा परिवार माझ्या बरोबर खंभीरपणे उभा आहे. याचा मला अभिमान आहे. अजित पवार हे खमके नेते आहेत. माझ्या नेत्यावर कुणी गल्लीतला गुंडा बोलत असेल, तर त्याच्या थोबाडीत मारण्याची ताकद आमच्यात आहे”, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.

फोटो – सोशल मीडिया

“आरोपींना तीन दिवसांनंतरही अटक का होत नाही?”

“मनसेचे नेते कर्णबाळ दुनबळे आणि अकोला पोलिसांचे काय संबंध आहेत. हे पुढे आलं पाहिजे. अकोल्यातल्या एका हॉटेलमध्ये काही पोलिसांनी त्यांची भेट घेतली आहे. ते मोकाट का फिरत आहेत. माझ्या सारख्या आमदारावर हल्ला होतो आणि तरीही आरोपींना तीन दिवस अटक का होत नाही?” असा प्रश्नही अमोल मिटकरी यांनी विचारला आहे.

हेही वाचा- “…तर अमोल मिटकरींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही,” मनसेचा इशारा; “होणाऱ्या परिणामाला…”

“एकतर ते जिवंत राहतील किंवा मी”

“मुंबईत बसून संदीप देशपांडे धमकी देत आहेत. इथे कर्णबाळ दुनबळे धमकी देतात, यांच्या काय बापाचं राज्य आहे का? त्यामुळे आता काहीही झालं तरी चालेल, एकतर आता मी जिवंत राहीन, किंवा ते जिवंत राहतील”, असा इशाराही त्यांनी दिला.

“मनसेच्या कार्यकर्त्यांशी माझे चांगले संबंध, मात्र…”

“ज्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला, त्यांचे आणि माझे यापूर्वी चांगले संबंध होते. मात्र, कर्णबाळ दुनबळे अकोल्यात आले आणि त्यांनी अकोल्याचं वातावरण खराब केलं. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे. पोलिसांनी त्यांना अभय का दिलं आहे, हे पुढे आलं पाहिजे, असेही ते म्हणाले. तसेच मी आज न्याय मागण्यासाठी इथे आंदोलनाला बसलो आहे”, असेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari criticized mns leaders allegation on akola police after attacked on car spb
Show comments