बीबीसीच्या दिल्लीतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईचे नेमके कारण अद्याप समजलं नसून प्राप्तिकर विभागाचे अधिकारी बीबीसीच्या कार्यालयात तपासणी करत असल्याची माहिती आहे. दरम्यान, यावरून विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही यावरून मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे.
हेही वाचा – BBC Income Tax Raid : BBC च्या दिल्लीतील कार्यालयावर धडकले प्राप्तिकर विभागाचे अधिकारी, नेमकं कारण काय?
काय म्हणाले अमोल मिटकरी?
देशात अघोषित आणीबाणीला सुरुवात झाली असून अदाणींचे पाप झाकण्यासाठी मोदी सरकारकडून बीबीसी कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचा छापा टाकण्यात आला, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच मोदी सरकारकडून राजरोसपणे लोकशाहीचा खून होत असल्याची टीकाही त्यांनी केली. याबरोबरच सरकारविरोधात जागरूक नागरिकांनी एकत्र येणे गरजेचं आहे, असेही ते म्हणाले.
बीबीसीवरील कारवाईवरून विरोधक आक्रमक
दरम्यान, बीबीसीवरील कारवाईवरून काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली असून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “अगोदर बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता बीबीसीवर प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. ही तर अघोपित आणीबाणी आहे”, असं ट्वीट काँग्रेसकडून करण्यात आलं आहे.