राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्राबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केली होती. त्यावरुन हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाकडून सत्ताधारी मंडळींना धारेवर धरलं होतं. पण, याप्रकरणी सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाने कोणतीही भूमिका घेतली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली. तसेच, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्यात सत्तांतर होईल, असा दावाही मिटकरींनी केला आहे.
अमोल मिटकरी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. “राज्यपालांविरोधात दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष कुठेच कमी पडला नाही. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यपालांची काळी टोपी फिरवून आंदोलन करण्यात आलं. पण, महापुरुषांच्या अस्मितेशी देणंघेणं नसलेल्या मग्रुर सरकारने राज्यपालांना पाठिशी घातलं. राज्यपालांवर अवमानाविरोधी विधेयक सभागृहात मांडा, अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. तेव्हा फडणवीसांनी विषय दुसरीकडे नेला,” असा आरोप मिटकरींनी केला आहे.
हेही वाचा : अब्दुल सत्तारांच्या स्वपक्षीय नेत्यांवर आरोप, रोख नेमका कोणाकडे? संदिपान भुमरे म्हणाले “याबाबत…”
“एकप्रकारे भाजपा आणि शिंदे गटाने राज्यपालांची पाठराखण केली आहे. महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही. २७ फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. तोपर्यंत महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं दिसेल,” असेही मिटकरींनी सांगितलं आहे.
हेही वाचा : ‘…तर आमदारांसह बेकायदा सरकार घरी गेलेलं दिसेल,’ नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी संजय राऊतांचा दावा
“भ्रष्टाचार के खिलाफ आजतक बोलते थे, वो अन्ना हजारे…”
महापुरुषांचा अपमान होत असताना सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, असे मिटकरींना विचारण्यात आलं. यावर मिटकरी म्हणाले, “अण्णा हजारेंची प्रकृती ठीक नाही आहे. पण, भाजपाच्या सोयीची भूमिका घेताना अन्ना हजारे बोलतात. भाजपा अडचणीत येईल, अशा स्थितीत अण्णा हजारे बोलत नाही. त्यामुळे त्यांच्यावर शंका येते. एका कवीने म्हटलं आहे, आरएसएसके राजदुलारे कहा गये.. भारत माँ के आख के तारे कहा गये.. भ्रष्टाचार के खिलाफ आजतक बोलते थे, वो अन्ना हजारे अब कहा गये..,” अशा कावात्मक ओळीतून अमोल मिटकरींनी अण्णा हजारेंवर टीका केली आहे.