शिवसेना पक्षात उघड उघड दोन गट पडल्यामुळे राज्यात मोटा सत्तापेच निर्माण झाला आहे. मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचा दुसरा गट स्थापन करण्याच्या तयारीत असून त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांसोबत सत्तेत वाटा नको आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे तसेच बंडखोर आमदारांवर कठोर कारवाईची भाषा केली आहे. या सर्व घडामोडी घडत असताना खासदार नवनीत राणा यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या याच मागणीला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सणसणीत उत्तर दिले असून राणा यांच्या तोंडी संविधानाची भाषा म्हणजे नथुराम गोडसेच्या तोंडी महात्मा गांधी यांचा जयजयकार करण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाशी ते बोलत होते.
हेही वाचा>>> महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; खासदार नवनीत राणा यांची मागणी
“नवणीत राणा आणि संविधानाचा काय संबंध आला? मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा अट्टहास करणाऱ्या रवी राणा आणि नवणीत राणा यांना संविधान कधीपासून कळायला लागलं? संविधानाचा खून करणारी ही लोकं आहेत. संविधानावर त्यांनी बोलू नये. संविधान अनुच्छेद दोन आणि चारनुसारच भारतीय जनता पार्टीचं सरकार बनू शकत नाही. इथे फ्लोअर टेस्ट करावी लागेल. इथे संविधानाने तुमच्यामध्ये आडकाठी आणली आहे,” अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केली.
हेही वाचा>>> “हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा”, उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना ठणकावलं!
तसेच पुढे बोलताना, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अपेक्षित असणारं सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊ नये यासाठी भारतीय लोकशाहीला धरून महाविकास आघाडी सरकार स्थापन करेन. नवणीत राणा आता संविधान बोलतात आणि विधान परिषदेचे आमदार हनुमान चालिसाच्या भरोशावर निवडून आले असे म्हणतात. एका म्यानामध्ये दोन तलवारी घालणाऱ्या बेगडी लोकांकडून संविधानाच्या बाबतीत आदरयुक्त शब्द म्हणजे नथुराम गोडसेच्या तोंडी महात्मा गांधी यांचा जयजयकार करण्याचा प्रकार आहे,” असेदेखील मिटकरी म्हणाले.
हेही वाचा>>> ‘जशास तसे उत्तर दिले जाईल’, कार्यालयाच्या तोडफोडीनंतर तानाजी सावंतांचा शिवसेनेला इशारा
नवणीत राणा काय म्हणाल्या होत्या?
“महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती अतिशय गंभीर असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे कार्यकर्ते असणारे शिवसैनिक आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले असताना त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व कुटुंबांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा पुरवून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी,” अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. खासदार राणा यांनी यापूर्वीदेखील अनेकदा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी केलेली आहे.