‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाच्या ‘तुतारी’ वाजवणारा माणूस’ या पक्षचिन्हाचा अनावरण सोहळा आज रायगड किल्ल्यावर संपन्न झाला. या सोहळ्यासाठी तब्बल ४० वर्षांनंतर शरद पवार रायगड किल्ल्यावर गेले होते. या कार्यक्रमानंतर भाजपा आणि अजित पवार गटाकडून टीका करण्यात आली आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते, आमदार अमोल मिटकरी म्हणाले, “कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हाचे लोकार्पण रायगडावर होणे, चुकीची बाब आहे.
या सोहळ्यावर शरद पवार गटातील सर्वच नेते समाधानी असतील तर आमदार रोहित पवार आणि आमदार राजेश टोपे हे त्याठिकाणी अनुपस्थित का राहिले? याचा अर्थ तुतारीचा निर्णय इतर लोकांना पटलेला दिसत नाही. रायगडच्या मातीत अशाप्रकारे राजकीय कार्यक्रम होणे अत्यंत चुकीचे आहे.”
‘४० वर्षांनी शरद पवार रायगडावर गेले, अजित पवारांना मानावंच लागेल’, कारण…
राजेश टोपे सहा आमदार घेऊन अजित पवार गटात येणार
“आज सकाळी कालवा समितीची पुण्यात बैठक झाली. दादांच्या नावे रोज नाकाने कांदा सोलणारा बालमित्र मंडळाचा अध्यक्षही (रोहित पवार) तिथे होते. आमच्याही पक्षाचे काही आमदार तिथे होते. हे सर्व आमदार पश्चिम महाराष्ट्रातील असून कालव्याशी संबंधित होते. पण या बैठकीनंतर राजेश टोपे यांनीही अजित पवारांची भेट घेतली. ही भेट गुप्त होती. हा फक्त ट्रेलर असून पिक्चर मार्च महिन्यात बघायला मिळेल. लवकरच मोठा विध्वंस होणार असून राजेश टोपे यांच्यासह सहा आमदार अजित पवार गटात येणार असल्याचा गौप्यस्फोट अमोल मिटकरी यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना केला.”
रायगडकडे जाताना वाट वाकडी करून राजेश टोपे अजित पवारांच्या भेटीला
जितेंद्र आव्हाड यांना दिले आव्हान
जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी वाजवून दाखवावी, त्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ असे आव्हान आमदार अमोल मिटकरी यांनी दिले होते. त्याप्रमाणे आज रायगड किल्ल्यावर तुतारी वाजवत असतानाचा आव्हाड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. मात्र या आव्हाड यांनी तुतारी वाजवली नसून ती फक्त तोंडाजवळ धरली असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला. जितेंद्र आव्हाड यांनी फक्त तोंडात तुतारी धरली आहे. त्यांच्या आजूबाजूला असलेल्या तुतारी वादकांचा आवाज व्हिडिओत ऐकू येत आहे, असेही मिटकरी म्हणाले.
एकट्याने तुतारी वाजवा, एक लाख रुपये घ्या
अमोल मिटकरी म्हणाले की, तुतारी वाजवताना पोट आत जातं, पण आव्हाड यांचं पोट बाहेर आलेलं दिसत आहे. त्यांनी एकट्याने तुतारीतून आवाज काढून दाखवावा. मी एक लाख रुपयांचा धनादेश तयार ठेवला आहे. त्यांनी तुतारी वाजवली की लगेच त्यांना मी या अधिवेशनात हा धनादेश सुपूर्द करेल.
“जितेंद्र आव्हाड जर शिवरायांचे खरेखुरे मावळे असतील तर ते एकट्याने तुतारी वाजवून दाखवतील. मी अनंत करमुसे सारखा छोटा माणूस आहे. ते करमुसेला मारू शकतात. तर मलाही मारू शकतात. ते म्हणतात तसे मला ५० हजार पगार आहे. अजित पवारांच्या कृपेमुळे माझ्या बँक खात्यात एक लाख रुपये सध्या आहेत. ते मी आव्हाड यांच्याकडे सुपूर्द करेन”, असेही अमोल मिटकरी म्हणाले.