अजित पवारांसह ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर मंत्रीपद आणि विधानसभा-लोकसभेच्या जागांवरुन महायुतीतील पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी आपण भाजपाला पाठिंबा दिला, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ९० जागांवर निवडणूक लढवणार आहे, असंही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण अजित पवार गट महायुतीत सामील झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार करणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर अजित पवार समर्थक आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी अजित पवारांना समर्थन दिलंय, याचा अर्थ मी भाजपाचा प्रचारक असेल किंवा भाजपा सत्तेवर येण्यासाठी मी प्रयत्न करेन, असं नाही, अशी प्रतिक्रिया मिटकरींनी दिली. ते ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

हेही वाचा- अजित पवारांकडे आमदारांचं बहुमत असल्यावर शिक्कामोर्तब? आता जयंत पाटीलही म्हणाले की…

आगामी निवडणुकांमध्ये जेव्हा महायुतीची एकत्रित सभा होईल, तेव्हा तुम्ही भाजपाचा प्रचारक म्हणून सभा घेणार का? असा सवाल विचारला असता अमोल मिटकरी म्हणाले, “विधानसभेच्या ९० जागांवर जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा असेल तिथे मी प्रचार करणार आहे. भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करणं माझ्यावर बंधनकारक नाही. अमोल मिटकरी हा महाराष्ट्रातला पुरोगामी चळवळीतला एक कार्यकर्ता आहे. त्याने त्याची विचारधारा आजपर्यंत जोपासली. त्या विचारधारेचा सन्मान म्हणून मी आज आमदार पदावर आहे. ती विचारधारा मी कधीही सोडणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.”

हेही वाचा- खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? सुनील तटकरेंनी जाहीर केली तारीख

“अजित पवार हे माझे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतलाय, त्याचं मी समर्थन केलंय. मात्र याचा अर्थ असा नाही की, मी भारतीय जनता पार्टीचा प्रचारक असेल किंवा भाजपाचं सरकार यावं, यासाठी मी प्रयत्न करेन. असं कधीही होणार नाही,” असंही मिटकरी म्हणाले.

हेही वाचा- “संजय राऊत यांचा एका अर्थाने बळी गेला…”, नीलम गोऱ्हेंचं भुवया उंचावणारं वक्तव्य

नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला पाठिंबा दिला, असं अजित पवारांनी स्वत: सांगितलं आहे. तुम्हीही त्यांच्याच पक्षातील आहात, मग भाजपाला निवडून येण्यासाठी मदत करणार नाही, असं कसं म्हणू शकता? असं विचारलं असता मिटकरी पुढे म्हणाले, “ते अजित दादांचं वैयक्तिक मत आहे. ते माझं वैयक्तिक मत नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari on ajit pawar faction election campaign for pm narendra modi rmm
Show comments