Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. आता निकालाला अवघे काही तास शिल्लक बाकी आहेत. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात नेमकी कोणाचं सरकार येणार? राज्यातील जनता कोणाला कौल देते? कोणता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरतो? याकडे जनतेचं लक्ष लागलेलं आहे. पण निकालाच्या आधीच राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरु आहे. यातच राजकीय नेत्यांकडून सरकार स्थापनेबाबत दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. तसेच मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुती आणि महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी अपक्षाची मदत लागू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे राजकीय हालचाली वाढल्या आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. “किंग आणि किंगमेकर सुद्धा अजित पवार असतील”, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

निकालाच्या काही तास आधी राजकीय हालचालींना वेग; महायुती अन् ‘मविआ’कडून ‘प्रहार’शी संपर्क, बच्चू कडूंची भूमिका काय?

अमोल मिटकरी काय म्हणाले?

“राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून एकूण ५६ उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यामध्ये दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती आहेत. त्यामध्ये जे आमचे उमेदवार आहेत ते आमचे मेरिटचे उमेदवार आहेत. मी देखील प्रचारासाठी फिरलो आहे. त्यामुळे एकंदरीत लक्षात येतं की ३५ ते ४० जागा आमच्या निवडून येतील. त्यामुळे हा आकडा सत्तास्थापनेसाठी मोठा आकडा असेल. या विश्वासावर मी पक्षाचा प्रचारक किंवा प्रवक्ता म्हणून ट्वीट केलं आहे की, किंग आणि किंगमेकर सुद्धा अजित पवार असतील. अशी माझी कार्यकर्ता म्हणून भावना आहे”, असं मोठं विधान अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

“उद्या दुपारपर्यंत मतदानाचं चित्र स्पष्ट होईल. आम्ही महायुतीबरोबर निवडणुका लढवलेल्या आहेत. अजित पवार जी भूमिका घेतील त्या निर्णयाला राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता बांधील आहे. उद्या एक वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रात जे चांगलं सरकार स्थापन होईल त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा सहभाग असेल. संजय शिरसाट यांनी जी भावना व्यक्त केली होती की पक्ष हितासाठी एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो त्यांना मान्य असेल. तशीच माझीही भावना आहे. माझ्या पक्षाचे नेते अजित पवार हे पक्ष हितासाठी जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू”, असं सूचक विधान अमोल मिटकरी यांनी केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari on ajit pawar king and kingmaker also maharashtra vidhansabha election 2024 politics gkt