राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरात ‘संघर्ष’ नावाच्या पुस्तकाचे वाटप केले. या पुस्तक वाटपावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. “सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या रोहित पवारांना ‘संघर्ष’ शब्दाचा अर्थ तरी कळतो का? असा सवाल गोपीचंद पडळकरांनी विचारला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोपीचंद पडळकरांच्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जी व्यक्ती पुस्तकं वाचत नाही. त्या व्यक्तीला टीका करण्याव्यतिरिक्त काही धंदा आहे, असं मला वाटत नाही. ज्यांच्या डोक्यात शेण भरलं आहे, त्या व्यक्तीला पुस्तकाचं महत्त्व कळणार नाही, असं प्रत्युत्तर मिटकरींनी दिलं आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “संजय राऊतांची तत्काळ शिवसेनेतून हकालपट्टी करा”, भाजपा नेत्याची उद्धव ठाकरेंकडे मागणी

गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता अमोल मिटकरी म्हणाले, “जी व्यक्ती पुस्तकं वाचत नाही. त्या व्यक्तीला टीका करण्याव्यतिरिक्त काही धंदा असेल, असं मला वाटत नाही. आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झालंय. गेल्या काही दिवसांत जाणीवपूर्वक सीमावाद सुरू केला आहे, महामानवांचा अपमान केला जात आहे. यामुळे आमच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून महापुरुषांच्या विचारांची पुस्तकं सर्वांना देण्यात आली.”“संजय राऊतांची तत्काळ शिवसेनेतून हकालपट्टी करा”, भाजपा नेत्याची उद्धव ठाकरेंकडे मागणी

हेही वाचा- अधिवेशनासाठी नागपूरला गेलेल्या शहाजीबापू पाटलांना राहण्यासाठी हॉटेल मिळेना? झाडी आणि डोंगरचा उल्लेख करत म्हणाले…

“भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना महापुरुषांबद्दल आदर नाही, यामुळे केवळ त्यांनाच ही पुस्तकं वाचायला दिली आहेत, असं अजिबात नाही. भाजपा नेत्यांच्या मनात महापुरुषांबाबत आदर वाढवा, म्हणून ही पुस्तकं दिली आहेत. महापुरुषांचा अपमान करणारी जी घाण त्यांच्या मेंदूत आहे, ती बाहेर गेली पाहिजे. तोही एक उद्देश होता. पण ज्याच्या मेंदूमध्ये शेणच भरलेलं असेल, त्या व्यक्तीला पुस्तकाचं महत्त्व कसं कळेल,” असा टोला अमोल मिटकरींनी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari on gopichand padalkar person whose brain is full of dung how know importance of book rohit pawar rmm