‘हर हर महादेव’ हा चित्रपट बंद पाडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाडांसह त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी ठाण्यातील विवीयाना मॉलमध्ये घुसून चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी आव्हाडांच्या काही कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाणही केली आहे. यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन, तोच शो पुन्हा सुरू केला. या घटनाक्रमानंतर ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद निर्माण झाला आहे.
आज ठाणे पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांनी जितेंद्र आव्हाडांना अटक केली आहे. आव्हाडांना अटक झाल्यानंतर राज्यातील विविध राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. मनसेनं आव्हाडांच्या अटकेचं स्वागत केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. तसेच नाव न घेता मनसेला इशारा दिला आहे.
त्यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटलं, “जितेंद्र आव्हाडांना आज महाराष्ट्र सरकारने ज्यापद्धतीने अटक केली आहे, ती अत्यंत बेकायदेशीर आहे. त्यासाठी या सरकारचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. ‘हर हर महादेव’ या चित्रपटाद्वारे चुकीच्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवला जात असेल आणि याला विरोध करणाऱ्याला जर हे सरकार अटक करत असेल तर हे सरकार शिवद्रोही आहे. सरकारने चालवलेली मोगलशाही आम्ही नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही.”
हेही वाचा- “…तर मी अटकेचं मनापासून स्वागत करते” जितेंद्र आव्हाडांवरील कारवाईनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
“आज जितेंद्र आव्हाडांना केलेली अटक आणि त्या अटकेनंतर तोंडसुख घेणारे एका छोट्या पक्षाचे दोन-चार वाचाळवीर, यांना आम्ही आगामी काळात सोडणार नाही” असा इशारा अमोल मिटकरींनी मनसेचं नाव न घेता दिला आहे.
हेही वाचा- जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया, गंभीर आरोप करत म्हणाल्या…
“काही तासांपूर्वी बावनकुळे यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं वक्तव्य केलंय, तरीही त्यांना अटक का केली नाही? असा आमचा सरकारला प्रश्न आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाविरोधात आवाज उठवला म्हणून तुम्ही तुरुंगात टाकत असाल तर असे हजारो आवाज तुरुंगात जायला तयार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेऊन मी हे बोलतोय आणि जितेंद्र आव्हाडांच्या अटकेचा मी निषेध करतो” अशा शब्दांत मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे.