राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर महायुतीतील अनेक नेत्यांच्या भूमिकांची गुंतागुंत झाली आहे. एकेकाळी एकमेकांवर जोरदार टीका करणाऱ्या नेत्यांनाही दोन पावलं मागे घ्यावी लागत आहेत. ज्या नेत्यांवर खालच्या पातळीची टीका करायचे, त्याच नेत्यांशी जुळवून घ्यावं लागत आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार निलेश राणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
खरं तर, अमोल मिटकरी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला असला तरी मी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करणार नाही.
या विधानावरून निलेश राणे यांनी खोचक ट्वीट केलं. “आत्ताच कुठेतरी वाचलं. मिटकरी म्हणतो मी भाजपचा प्रचार करणार नाही. अमोल मिटकरी नेमका कोण आहे. आमच्या कोकणात मिटकरीसारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात. काही लोकांना भलताच कॉन्फिडन्स असतो, अशी टीका निलेश राणेंनी केली. राणेंच्या या टीकेला अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा- अजित पवारांच्या अडचणी वाढणार? लवासाप्रकरणी उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
“अबे तू नेमका कुणाचा प्रचार करणार आहे, ते ठरव आधी आणि गप राहायला शिक. तृतीयपंथीयांनी तुला तुझी लायकी दाखवली आहेच. कशाला वारंवर तोंड काळं करुन घेतोस?” अशी खोचक प्रत्युत्तर अमोल मिटकरींनी दिलं. अजित पवार गट सत्तेत सहभागी होऊन दोन आठवडेही उलटले नाहीत. तोपर्यंत महायुतीच्या नेत्यांची आपसात जुंपली आहे.
हेही वाचा- “ते दादांचं वैयक्तिक मत, माझं नाही”, अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं विधान चर्चेत
अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले?
‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत अमोल मिटकरी म्हणाले, “अजित पवार हे माझे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतलाय, त्याचं मी समर्थन केलंय. मात्र याचा अर्थ असा नाही की, मी भारतीय जनता पार्टीचा प्रचारक असेल किंवा भाजपाचं सरकार यावं, यासाठी मी प्रयत्न करेन. असं कधीही होणार नाही.”