दरवर्षी आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी आळंदीत दाखल होत असतात. याच पार्श्वभूमीवर आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा उत्साहात पार पडला. दरम्यान, पालखी सोहळ्याला गालबोट लावणारी घटना घडली आहे. आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
आळंदी येथील पालखीत वारकऱ्यांवर झालेला हल्ला निषेधार्य आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अन्यथा वारकरी आषाढीची पूजा करू देणार नाहीत, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला. दरम्यान, त्यांनी भाजपा आमदार नितेश राणे आणि अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्यावर नाव न घेता खोचक टीका केली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे ही टीका केली.
हेही वाचा- VIDEO: माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यादरम्यान आळंदीत पोलिसांकडून वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार
अमोल मिटकरी ट्विटमध्ये म्हणाले, “हिंदुत्वाचे सरकार असल्याचा आव आणणारा टिल्लू आमदार व अध्यात्मिक आघाडीचा तो ‘झाकणझुल्या’ कुठाय? आळंदीच्या पालखीत वारकऱ्यांवर झालेला हल्ला निषेधार्य आहे. गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अन्यथा वारकरी आषाढीची पूजा करू देणार नाहीत.”
आळंदीत लाठीमार झाला नाही, किरकोळ झटापट झाली- पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे
आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमार झाल्याची घटना घडल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आज अचानक काही स्थानिक युवकांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते. बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, असं म्हणणे खोटं आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, ही माझी नम्र विनंती आहे, असं पोलीस आयुक्त चौबे यांनी सांगितलं.