आगामी विधान परिषद निवडणुकींसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. सदाभाऊ खोत यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरुन खोत यांना टोला लगावलाय. फडणवीसांनी खोत यांना आराम करण्याचा सल्ला दिल्याचा शाब्दिक चिमटा मिटकरींनी काढलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला मोठा फटका बसला आहे. यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष सावध झाले आहेत. २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक गुप्त पद्धतीने होणार असल्याने मोठा दगाफटका होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधान परिषदेचा अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. शेवटच्या पंधरा मिनिटांपर्यंत कोणत्याही पक्षाकडून अर्ज मागे घेण्यात आला नव्हता. पण अखेरच्या क्षणी सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपाकडून पाच उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले जातील, हे स्पष्ट झालं आहे. सदाभाऊ खोत यांनी भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता.

अर्ज मागे घेतल्यानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना खोत यांनी, “भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस जे काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल,” अशी प्रतिक्रिया दिली. याचवरुन मिटकरींनी खोत यांना लक्ष्य केलंय. “सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणूनच फडणवीसांनी आपणास विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय,” असं मिटकरींनी ट्विटरवरुन म्हटलंय. तसेच पुढे बोलताना मिटकरींनी, “आपण माघार घेतली यावर विश्वासच बसत नाही,” असंही म्हटलंय.

पुढे बोलताना मिटकरी यांनी, “भाऊ त्या फडणवीसांना सांगा, म्हणावं, “म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी थकलो नाय. आणखी दोन पावलं माग येऊन सन्या गुमान बसल,” असं म्हणत खास गावरान भाषेत खोत यांना मिटकरींनी शाब्दिक चिमटा काढलाय.

दुसरीकडे काँग्रेस आपला एक उमेदवार मागे घेतील अशी चर्चा होती, मात्र काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतलेला नाही. त्यामुळे आता जागांवर ११ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची निवडणूक देखील चुरशीची होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari on sadabhau khot taking back his name from vidhan parishad election scsg