राज्यात गुलाबी गुलाबी गँगचे दहा-बारा आमदारही निवडून येणार नाही, अशी टीका रोहित पवार यांनी अजित पवार गटावर केली होती. शनिवारी जामखेड येथील सभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं होतं. त्यांच्या या टीकेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, या टीकेला आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?
“रोहित पवार यांनी आमच्या पक्षाची चिंता करू नये. त्यांनी स्वतःचं अस्तित्व काय आहे? स्वतःची लायकी काय आहे? याचा विचार केला पाहिजे. त्यांच्या डोक्यात जातीय अहंकार भरला आहे. स्वतः आपण कोण आहोत, याचा विचार केला पाहिजे, अशा बालिश व्यक्तीने अजित पवार यांच्याबद्दल बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे”, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.
“रोहित पवारांच्या मेंदूत ५० टक्के शेण भरलं आहे”
“रोहित पवार यांची बुद्धी बालीश आहे. ते फक्त स्टँस्ट करतात. त्यांच्या मेंदूत ५० टक्के शेण भरलं आहे. त्यामुळे ते काय जेवतात, हे तपासणं आवश्यक आहे. अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आमचं एवढेच सांगणे की त्यांनी त्यांच्या थोबाडाचा पट्टा हा त्यांच्या पक्षवाढीसाठी चालवावा. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( अजित पवार गट) नेत्यावर टीका करू नये, अन्यथा त्यांच्याहीपेक्षा खालच्या पातळीवर जाऊन उत्तर देण्यात येईल”, असा इशाराही अमोल मिटकरी यांनी दिला.
हेही वाचा – Amol Mitkari : “…तर मोठा विध्वंस होईल”, मिटकरींचा शिंदे गटाला इशारा; महायुतीत नेमकं काय घडतंय?
“मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास रोहित पवार यांना मंत्री केलं जाईल, असं संकेत शरद पवार यांनी दिले होते. त्यावरही अमोल मिटकरी यांनी भाष्य केलं. “ज्यांना स्वत: घर सांभाळता आलं नाही, ज्यांना स्वत:च्या परिवाराबाबत आदर नाही. ज्यांच्या मनात इतर समाजाबाबत द्वेष आहे, अशा रोहित पवार यांनी आधी आपला मतदारसंघ सांभाळावा. नंतर महाराष्ट्राची स्वप्न बघावी, शरद पवार यांनी जरी मंत्रीपदाचे संकेत दिले असले, तरी रोहित पवार यांची योग्यता आहे का, हे तपासणं आवश्यक आहे”, असे ते म्हणाले.