उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो वापरण्यावरून कलगीतुरा रंगला आहे. अजित पवारांच्या समर्थकांकडून शरद पवारांचे फोटो वापरण्यात येत आहेत. फोटो वापरणाऱ्यांना शरद पवारांनीही इशारा दिला आहे. तर, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांचा फोटो वापरण्यास आक्षेप घेतला होता. आता जितेंद्र आव्हाडांना आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार काय म्हणाले?

“मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनीच आमचे फोटो वापरावे. ज्यांनी आमच्या विचारसरणीचा विश्वासघात केला, त्यांनी माझा फोटो वापरू नये. माझा फोटो कुणाला वापरू द्यायचा, हा माझ्या हयातीत तरी माझाच निर्णय आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

हेही वाचा : “शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची…”, रोहित पवारांचं विधान

“शरद पवार कशाला पाहिजेत?”

यानंतरही महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शरद पवारांचा फोटो वापरला होता. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “जिवंत माणूस जेव्हा सांगतो, माझे फोटो वापरायचे नाहीत. तर, विषय संपला. तुमच्याकडे आहेत, ना तुमचे राष्ट्रीय नेते दिल्लीचे वगैरे. त्यांचे फोटो वापरा. शरद पवार कशाला पाहिजेत?”

हेही वाचा : “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे, पण…”, सुषमा अंधारेंचं विधान

“शरद पवार सर्वांचे आहेत”

याबद्दल अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “शरद पवार जितेंद्र आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही आहेत. शरद पवार सर्वांचे आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी अशी वक्तव्ये करू नयेत,” अशा शब्दांत अमोल मिटकरींनी खडसावलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari reply jitendra awhad over dont use sharad pawar photo ssa
Show comments