बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही, ५० वर्षे आम्ही तुम्हाला निवडून देतो आहे. ‘तू कसा निवडून येतोस तेच पाहतो’, असे म्हणणाऱ्या अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात माजी मंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले आहेत. अपक्ष उमेदवार बनून बारामती लोकसभा लढवण्यासंदर्भात शिवतारे यांनी सोमवारी (११ मार्च) घोषणा केली.‘शिवतारे कसे निवडून येतात तेच पाहतो’ असे म्हणत अजित पवार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत (२०१९) शिवतारेंना पराभवाची धूळ चारली होती.
विजय शिवतारे आणि अजित पवारांमधील संघर्ष जगजाहीर आहे. आता हे दोन्ही नेते महायुतीत एकत्र असले तरी दोघांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा बदला घेण्यासाठी विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मतदारसंघातून लोकसभा लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे शिवतारे बारामतीत अजित पवारांना पराभूत करून २०१९ चा बदला घेण्याच्या विचारात आहेत. दरम्यान, पवार कुटुंबाला आव्हान देत शिवतारे म्हणाले, पुरंदरच्या स्वाभिमानी जनतसेठी मी मोठमोठ्या नेत्यांशी पंगा घेतला आहे. लोकसभेची निवडणूक समोर आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्राताई… हेच सगळीकडे चाललंय ना… अरे बारामती हा देशातला एक लोकसभा मतदारसंघ आहे. हा काही कोणाचा सातबारा नाही. ५० वर्षे बारामतीचा खासदार पाहिजे, अशी काहींची भूमिका आहे. परंतु, पुरंदर, इंदापूर भोरचा का नको? का म्हणून आम्ही यांना मतदान करायचं पाच-पाच वेळा, दहा-दहा वेळा यांना निवडून द्यायचं… काय मिळालं आम्हाला…?
विजय शिवतारे म्हणाले, गेल्या निवडणुकीत त्यांना (सुप्रिया सुळे) ६ लाख ८६ हजार मतं मिळाली होती आणि ५ लाख ८० हजार मतं पवार कुटुंबाच्या विरोधात होती. त्या सहा लाखांमध्ये (५.८०) दोन पवार आणि पाच लाखांमध्ये एकटा विजय शिवतारे असेल. पुरंदर, भोर, इंदापूर आपल्या बाजूने असेल. ही लढाई आता आरपारची आहे आणि मी लढायचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा >> भास्कर जाधव अजित पवार गटात जाणार? धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, “एक चांगली व्यक्ती आमच्याकडे…”
विजय शिवतारे यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवतारेंना आवर घालण्याची विनंती केली आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करत शिंदेंकडे विनंती केली आहे की, विजय शिवतारेंना आवरा. त्यांनी बोलण्यात हलकटपणाचा कळस केला आहे. शिवतारे महायुतीत राहुन अजित पवारांविरुद्ध बोलण्याचा उन्मत्तपणा करत असतील तर आमचाही नाईलाज होईल.