राज्यातील सत्तासंघर्षानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी लागत आहे. तर मागील अडीच वर्षांपासून विरोधी बाकावर बसलेल्या भाजपाला शिंदे गटाच्या मदतीने सत्तेची फळं चाखायला मिळत आहेत. या सत्ताबदलानंतर आता विरोधी पक्षातील नेते शिंदे गट आणि भाजपावर टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्र्यांना पीए ठेवले आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानतो, असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे. याबाबतचे वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे.
हेही वाचा >>> Video : “वाजपेयीही मोदींविरोधातल्या कटात सामील होते का?” काँग्रेसनं शेअर केलेला वाजपेयींचा जुना व्हिडीओ व्हायरल!
“आता पत्रकार परिषदेत दोन माईक घेतले आहेत. मुख्यमंत्रिपदाचा आदर केला त्याबद्दल आनंदच आहे. पण एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्र्यांना पीए ठेवलं. याबद्दल मी त्यांचे खरोखर आभार मानतो,” असे अमोल मिटकरी म्हणाले.
हेही वाचा >>> Ukraine War: सनफ्लॉवर ऑइलच्या बदल्यात बीअर; तेलटंचाईवर मात करण्यासाठी जर्मनीमधल्या पब्जची शक्कल
मागील काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद सुरु असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरचा माईक खेचला होता. फडणवीसांच्या या कृतीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. यावरदेखील मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. “मागच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरेंना बोलायचे नसल्यास ते उपमुख्यमंत्र्यांना माईक द्यायचे. त्यानंतर अजित पवार प्रास्ताविक करायचे. उद्धव ठाकरे स्वत:हून माईक द्यायचे. देवेंद्र फडणवीसांनी परवा एक चिठ्ठी एकनाथ शिंदे यांना दिली. कोल्हापूरमध्ये शिंदे गटात सामील झालेल्या लोकांची नावे शिंदे यांनी घेतले. मात्र भाजपाच्या महाडिकांचे नाव त्यांनी घेतले नाही. याची सल फडणवीस यांच्या मनात होती. माईक खेचला जातोय. उद्या काय काय खेचले जाईल, हे सांगता येत नाही,” अशी खोचक टीका मिटकरी यांनी केली.