लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेवल्याने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात महायुती सरकारकडून जागा वाटपासंदर्भात चर्चा चालू आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर काहीच महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे तीन पक्ष एकत्र आलेल्या महायुतीसमोर जागावाटपाचा मोठा प्रश्न असेल. दरम्यान एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट विधानसभा निवडणुकीत ठराविक जागांसाठी अडून बसल्याचं चित्र आहे. यावरून अजित पवार गटातील नेते तथा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.
समसमान जागावाटप व्हावं अशी मागणी अजित पवारांनी केली होती. अजित पवारांच्या या वक्तव्यावर मंत्री छगन भुजबळ म्हणाले, अजित पवार हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे जागावाटपात त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे. शिंदे गटाचे जितके आमदार आहेत, तितकेच आमदार आमच्या पक्षाचेही आहेत. त्यामुळे सारासार विचार करता त्यांच्याप्रमाणेच आम्हालाही न्याय मिळायला हवा, असं मत मांडलं तर ते चुकीचं नाही.
दरम्यान, अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी लोकसभेच्या जागावाटपावर भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदार संघात त्यांचा उमेदवार उभा करण्याची तयारी केली आहे. ते गेल्या दोन दिवसांपासून शिरूर मतदारसंघाचा आढावा घेत आहे. त्यांनी शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनादेखील आव्हान दिलं आहे. याबाबत अमोल मिटकरी यांनी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.
हे ही वाचा >> “अजित पवार चार महिन्यांत तुरुंगात जाणार”, शालिनीताई पाटलांचा दावा, एकनाथ शिंदेंबाबतही केलं मोठं वक्तव्य
अजित पवार सतत शिरूरला जात आहेत, याबाबत अमोल मिटकरी म्हणाले, भारतीय लोकशाहीत प्रत्येकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे. अजित पवार हे शिरूरमध्ये आमचा उमेदवार उभा करतील, असं त्यांनी आधीच सांगितलं आहे. तसेच ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीदेखील आहेत. त्यामुळे ते तिथे जात आहेत. अजित पवार शिरूरमध्ये आमचा उमेदवार देणार आणि त्याला निवडून आणणार. शिरूर, बारामती, रायगड यासह लोकसभेच्या सात ते आठ जागा आमच्या पक्षाने महायुतीत मागितल्या आहेत. त्याची सध्या चाचपणी चालू आहे.